कोट्यवधींची जमीन अनेकांना विकली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 ऑगस्ट 2019

नागपूर : हुडकेश्‍वरमध्ये एका "बंटी-बबली'ने पाच एकर जमीन एका व्यक्‍तीला विकल्यानंतर पुन्हा तीच जमीन जम्बुद्वीप बिल्डर्स अँड डेव्हलपर्सला विकून फसवणूक केली. ही फसवणूक करण्यासाठी सहदुय्यम निबंधकाचीही मदत घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी हुडकेश्‍वर पोलिसांनी बंटी-बबलीविरुद्ध गुन्हा दाखल केला. ऊर्मिला होमदेव जाधव (रा. प्लॉट नं. 36, महालक्ष्मीनगर, हुडकेश्वर) आणि अशोक दत्तूजी मसराम (रा. आदिवासीनगर, दिघोरी) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी हा सर्व गैरकायदेशीर घोळ करताना मृत पावलेल्या व्यक्तीला जिवंत दाखवून त्यांच्या नावे असलेले घोषणापत्र दुय्यम निबंधक कार्यालयात विक्रीपत्रासोबत सादर केल्याची बाब तपासात उघडकीस आली. राजेश पुरुषोत्तम बोरकर (50, रा. वंदना अपार्टमेंट, दुसरा बसस्टॉप, गोपालनगर) असे फिर्यादीचे नाव आहे. त्यांची संजय सदुजी सोमकुवर (46, सुरेंद्रनगर, बजाजनगर) यांच्याशी भागीदारी आहे. जम्बुद्वीप बिल्डर्स ऍण्ड डेव्हलपर्सच्या नावाने फर्म नोंदणी असून याद्वारे बोरकर व सोमकुवर हे दोघेही जमीन खरेदी व विक्रीचा व्यवसाय करतात. आरोपींनी 16 नोव्हेंबर 2010 ला मौजा चिखली खुर्द पहन 39-अ, शिट क्र. 519/45, सिटी सर्वे नं. 76, खसरा नं. 31/2-क, एकूण आराजी 2 हेक्‍टर 97 आर पैकी 2 हेक्‍टर (पाच एकर) शेतजमीन मूळ मालक भास्कर तानबा चव्हाण, उमाबाई खंडाळे व किसन तानबा चव्हाण आणि पार्वताबाई शेषराव गायकवाड यांच्याकडून विक्रीचा विकासाचा करारनामा दुय्यम निबंधक कार्यालयातून नोंदणीकृत करून घेतला. हा सौदा दीड कोटीचा ठरला होता. करारनाम्यावेळी 37 लाख 50 हजार रुपये देण्यात आले. उर्वरित रकम आठ महिन्याच्या कालावधीत देण्याचे ठरले. मात्र त्यात ते असमर्थ ठरल्याने त्यांनी जम्बुद्वीप डेव्हलपर्सला भागीदाराचा प्रस्ताव दिला असता तो मान्य केला. मात्र नंतर त्यांनी ही शेतीच विकायची असल्याचे सांगितल्याने 3 कोटी 50 लाख रुपयांत रजिस्टर नोटरी करून खरेदी करारनामा केला. दरम्यान, 50 लाख रुपये दिले. तर उर्वरित रकम 3 कोटी रुपये धनादेशाद्वारे दिले. जयवंत को ऑपरेटिव्ह सोसायटीचे मालक निरंजन तराळे यांनी अर्धी जमीन विकत घेतल्याचा दावा केला. त्यामुळे बोरकर यांना धक्का बसला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Millions of land were sold to many