कृषी मंत्र्यांनी पिकाची उत्पादकता वाढीचे दिले लक्ष्य...कोणत्याही पिकाचे किती उत्पादन वाचा..

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

यंदाचे वर्ष हे उत्पादका वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात पिकनिहाय उत्पादकता वाढीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.

अकोला : यंदाचे वर्ष हे उत्पादका वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात पिकनिहाय उत्पादकता वाढीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना थेट बांधापर्यंत या निविष्ठा पोहोचवणे, शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत बियाणे खतांची कमतरता भासू देऊ नका, असे निर्देश राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी बुधवारी यंत्रणेला दिले.
अकोला येथे खरीप हंगाम 2020 च्या विभागीय जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक घेण्यात आली. यावेळी अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा आढावा घेणार घेण्यात आला. बैठकीस विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. प्रवीण लोखंडे, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक आलोक तारेणिया आदी उपस्थित होते.

32.60 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन
अमरावती विभागात लागवड योग्य क्षेत्र 35.14 लाख हेक्टर इतके असून, खरीप हंगामाचे क्षेत्र हे 32.32 लाख हेक्टर इतके आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्याने आपापले नियोजन सादर केले. त्यानुसार अमरावती विभागात खरीप हंगामात यंदा बुलडाणा जिल्ह्यात 7.48 लाख हेक्टर, अकोला जिल्ह्यात 4.81 लाख हेक्टर, वाशिम 4.04 लाख हेक्टर, अमरावती 7.28 लाख हेक्टर आणि यवतमाळ 8.99 लाख हेक्टर असे एकूण 32.60 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन आहे.

उत्पादकता वाढीसाठी लक्ष्यांक
यंदाचे वर्ष हे उत्पादकता वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात यंदा पिकनिहाय उत्पादकता वाढीसाठी लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यात सोयाबीन पिकासाठी 13530 हेक्टर क्षेत्रावर 15 हजार 722 मे. टन, कापूस 11546 हेक्टरवर 25538 मे. टन, तूर 4452 हेक्टरवर 4608 मे.टन, मूग 983 हेक्टरवर 551 मे. टन, उडीद 756 हेक्टरवर 413 मे टन, खरीप ज्वारी 700 हेक्टरवर 646 मे टन तर मका 365 हेक्टरवर 726 मे टन इतका उत्पादनाचा लक्ष्यांक ठरविण्यात आला आहे.

बियाणे, खतांची उपलब्धता
यंदा विभागात बियाणे उपलब्धतेसाठी ही नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार सोयाबीन पिकासाठी 5.58 लाख क्विंटल बियाण्याची आवश्यकता असून, त्यापैकी सार्वजनिक क्षेत्राकडून 2.88 लाख क्विंटल व खाजगी कंपन्यांकडून 2.70 लाख क्विंटल बियाण्याची उपलब्धता होणार आहे. बी.टी कापूस बियाण्याची आवश्यकता 60.64 लाख पाकिटांची असून 78.38 लाख पाकिटांची उपलब्धता होणार आहे. तूर पिकासाठी 0.39 लाख क्विंटल बियाणे आवश्यक आहे, मुगाचे 0.07 लाख क्विंटल, उडीद 0.07 लाख क्विंटल, मका 0.05 लाख क्विंटल, खरीप ज्वारी 0.06 लाख क्विंटल आवश्यकता असून याप्रमाणे बियाण्यांची उपलब्धता करण्यात आली आहे. विभागात खतांचे 5.49 लाख मे.टनाचे आवंटन मंजूर असून 31 मार्च 2020 अखेर विभागात 0.92 लाख मेट्रिक टन शिल्लक साठा आहे. खरीप 2020 साठी 6.19 लाख मे.टन खतांची मागणी करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Minister of Agriculture has set a target to increase the productivity of the crop ... Read how much production of any crop ..