काय सांगता..! गोंदिया जिल्ह्यात आहे जगातील सर्वाधिक वयाची महिला (व्हिडिओ) 

Domanbai Harinkhede
Domanbai Harinkhede

गोंदिया / आमगाव : अरे बापरे...! 117 वर्षांची महिला आणि तिही आजच्या काळात! विश्‍वासच बसत नाही. मात्र, हे खरे आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्‍यात असलेल्या तिगाव येथील ही महिला असून ती जगातील सर्वाधिक वयाची असल्याचा दावा तिच्या वृद्ध मुलाकडून करण्यात येत आहे. डोमनबाई बालाराम हरीणखेडे असे या आजीबाईचे नाव आहे. 

तिगाव हे गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्‍यात असलेले छोटेसे गाव. याच गावात डोमनबाईचा जन्म झाला. लहानाची मोठी झाल्यानंतर याच गावातील बालाराम हरीणखेडे यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. शिक्षणाचा गंध नसल्याने डोमनबाई पती बालासोबत शेती करायच्या. त्यांना दोन मुले व तीन मुली झाल्या. संसाराचा गाडा पुढे हाकताना त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. त्यांनी त्याकाळी आलेला प्लेग, कॉलरा यांसारखे भयानक आजार तसेच 1972 च्या दुष्काळाची दाहकताही अनुभवली. डोमनबाई यांचे पती बालाराम यांचे 30 वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांच्या 5 मुलांपैकी सर्वात लहान मुलगा किसनलाल हे आज 67 वर्षांचे आहेत. सर्वात मोठा मुलगा बाबूलाल यांचे आजारपणामुळे 35 वर्षांपूर्वी निधन झाले होते. तीन मुली सासरी गेल्यानंतर डोमनबाई लहान मुलगा किसनलाल यांच्यासोबत राहू लागल्या. वयोमानानुसार डोमनबाईला ऐकू येत नसल्याने तसेच त्या स्पष्ट बोलू शकत नसल्याने मुलगा किसनलाल यांनीच आपल्या आई-वडिलांनी जीवनात केलेल्या संघर्षाचे आणि दुष्काळी परिस्थितीत झेललेल्या संकटांचे वर्णन केले. 

किसनलाल म्हणाले, घरी शेती असूनही त्या काळी पडलेल्या दुष्काळात धान्य मिळत नव्हते. त्यामुळे आमगाव व परिसरातील गावांमध्ये मोळ्या विकून आम्ही पोट भरत होतो. कधी आंबिल तर कधी चटणी, भाकर, घुगऱ्या, मकाभुसा खाऊन दिवसांमागून दिवस काढत होतो. आई डोमनबाईंबद्दल सांगताना ते म्हणतात, ""आईचा जन्म 3 मे 1903 मध्ये झाला. आज तिला 117 वर्षे पूर्ण झाली आहेत. मला चष्मा लागला, डोळ्यांनी स्पष्ट दिसत नाही. मात्र, माझ्या आईची दृष्टी अतिशय उत्तम आहे. तिला इतक्‍या वयातही अजूनपर्यंत चष्मा लागला नाही. उतारवयामुळे तिला व्यवस्थित बोलता येत नाही आणि ऐकूही येत नाही, मात्र दात अजूनही पडले नाहीत. मूठभर चणे ती क्षणात फस्त करते. प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी वगळता ती आजही ठणठणीत आहे. हातात काठीचा आधार घेऊन ती स्वतःच चालते. भाजी, भात, वरण आणि पोळी असा तिचा रोजचा साधा आहार आहे. क्वचितप्रसंगीच ती मांसाहार करते.'' 

जगात सर्वाधिक वय असल्याचा दावा 

किसनलाल म्हणाले की, आईच्या जन्माचा कुठेही दाखला उपलब्ध नाही. कारण ती शाळेतच गेली नाही. मात्र, ती 117 वर्षांची आहे. डोमनबाई यांचे आधारकार्ड आहे. परंतु त्यावरील वय चुकीचे नोंदविण्यात आले आहे. गुगलवरील माहितीनुसार, जगातील सर्वात वयोवृद्ध महिलेचे वय 112 वर्षे असून ती अमेरिकन आहे, या माहितीनुसार माझी आई जगातील सर्वाधिक वयाची महिला ठरू शकते, असेही ते "सकाळ'शी बोलताना म्हणाले.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com