कोरोना वाढण्याची भिती? टाळेबंदी धाब्यावर, नागरिकांची गर्दीचगर्दी!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

नवेगावबांध येथे जिल्हा प्रशासनाने दारूसह सर्वच दुकाने सोमवार ते रविवार सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत खुली ठेवण्याची मुभा दिल्याने संचारबंदी नावालाच उरली आहे.

नवेगावबांध (जि. गोंदिया) : जिल्हा प्रशासनाने शिथील केलेल्या अटींचा गैरफायदा नागरिक घेत असून, मास्क न वापरता अनेकजण खुलेआम फिरत आहेत. सामाजिक अंतराचे कुठेही पालन होताना दिसत नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गुरुवारी (ता. 21) एकाच दिवशी जिल्ह्यात 26 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यातील बहुतेक रुग्ण अर्जुनी मोरगाव तालुक्‍यातील असल्याचे समजते. हे सर्व रुग्ण मुंबईसह अन्य मोठ्या शहरांतून आले आहेत. असे असताना गावातील स्थानिक प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याचा संताप गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायदा लागू करण्यात आला आहे. सुरुवातीला लॉकडाउन 1, 2, 3 मध्ये नागरिकांनी योग्य काळजी घेतली. परंतु, आता अचानक नवेगावबांध येथे जिल्हा प्रशासनाने दारूसह सर्वच दुकाने सोमवार ते रविवार सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत खुली ठेवण्याची मुभा दिल्याने संचारबंदी नावालाच उरली आहे. मोबाईल, किराणा, कापड दुकान, देशी दारूचे दुकान, जनरल स्टोअर्स, स्वस्त धान्य दुकान, पान व चहाच्या टपऱ्या जवळपास सर्वच बाजारपेठ खुल्लमखुल्ला सुरू आहे. गुरुवारी (ता.21) सायंकाळी आझाद चौकात भररस्त्यावर भाजीपाल्याचे दुकान व हातठेले यांची एकच गर्दी झाली होती. त्यामुळे काही काळ वाहतुकीला अडथळादेखील निर्माण झाला होता. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत कोरोनाचा आणखी धोका वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

सविस्तर वाचा - कर्जमाफी झाली, आता पीककर्ज देण्यास बँकेची ना, काय आहे कारण..
तालुका प्रशासनाचे एकमेकांकडे बोट
नाका-तोंडाला मास्क किंवा रुमाल न बांधणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे. मात्र, याकडे स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. तरुणाई तर दुचाकीवर कधी दोघे, तर कधी तिघे असे नियम धाब्यावर बसवून फिरत आहे. परंतु, कारवाईसाठी कोणीही पुढाकार घेताना दिसत नाही. पोलिस विभाग ग्रामपंचायतीकडे तर, ग्रामपंचायत महसूल विभागाकडे बोट दाखवतो. यांच्यात समन्वयाचा अभाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. ग्राम आपत्ती व्यवस्थापन समिती फक्त कागदावरच उरली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mob seen on road in lockdown 4