चीनच्या मैदानावर चालणार मोनालीचा तिरकमठा

आशिष ठाकरे
रविवार, 5 मे 2019

- भारतीय तिरंदाजी संघात विदर्भातून एकटीने मिळविले स्थान
- आजपासून पदकासाठी देणार आंतरराष्ट्रीयस्तरावर झुंज

बुलडाणा : नसीब हे कुणाच्या कपाळावर नव्हे तर त्यांच्या हातात असून, ते घडविण्यासाठी इच्छाशक्ती आणि प्रयत्नाची पराकाष्टा करण्याची तयारी असणे गरजेचे आहे. बुुलडाण्यासारख्या मागास व आर्थिकदृष्ट्या प्रगती नसलेल्या जिल्ह्यातून स्वत:च्या मनगटातील जोर दाखवित विविध मैदानावर तिरंदाजीतून निशाणा टिपत, थेट चायना येथे भारताचे प्रतिनिधीत्व करत बुलडाण्याच्या मोनाली चंद्रहर्ष जाधव हीने आंतरराष्ट्रीयस्तरावर यशाला गवसणी घालण्यासाठी उद्यापासून (ता.6) 12 मे पर्यंत वेगवेगळ्यास्तरावर प्रयत्न करणार आहे.

पोलिस दलातील कर्मचार्‍याचे कर्तव्य म्हटले की, कामाचा आणि येणार्‍या ताणतणावाची वेगळी सांगण्याची गरज नाही. परंतु, सर्वसामान्य जीवन जगण्यापेक्षा देशासह आपल्या लोकांसाठी काहीतरी करण्याची धडपड मोनालीच्या सतत मनात होती. वडील चंद्रहर्ष जाधव हे मजूरी करत कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवित होते. घरात आई, मोठी बहीण आणि भाऊ. त्यातच 2012 मध्ये त्यांच्या कुटुंबीयांवर संकट कोसळत वडिलांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे कुटुंबीयांची परिस्थिती आणखीच बेताची झाली. परिस्थितीसोबत दोन हात करत त्यावेळीपर्यंत मोनालीने 12 वीचे शिक्षण सुरु होते. हलाकीच्या परिस्थितीत तिन्ही भावंडांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहत आईने शिवणकाम करत कुटुंबांचा गाडा ओढला. परंतु, परिस्थिती आणि आईवर येणार्‍या कामाचा ताण मोनालीला चिंतीत करत होते.

शहरापासून काही अंतरावर असलेल्या आनंदनगर भागात नातेवाईकांच्या जागेवर तिचे टीनशेडचे घर आहे. यामुळे 12 वीमध्ये मेरीट आल्यानंतरही कुटुंबीयांचा आधार होण्यासाठी पोलिस दलामध्ये सामिल होण्याचा धाडसी निर्णय तिने घेतला.

अधिकारी होण्याचे स्वप्नं अधूरे
लहानपणापासूनच अभ्यासामध्ये हुशार असलेल्या मोनालीला उच्च शिक्षण घेऊन देशसेवा करण्याची इच्छा होती. परंतु, परिस्थिती पुढे तिला हात टेकावे लागले. कर्तव्यासोबतच अधूरी असलेली शिक्षणाची कास न सोडता तिने मुक्त
विद्यापीठाचा आधार घेत पदवीचे शिक्षण सुरुच ठेवले आहे.

हुन्नेर हेरणारे प्रशिक्षक
बुलडाणा पोलिस दलामध्ये शिपाई म्हणून कार्यरत असलेली मोनाली चंद्रहर्ष जाधव या 25 वर्षीय तरुणीने स्वत:च्या यशाचे गोतक स्वत:चा मांडले. तिच्या यशस्वी कारर्किदला 14 वर्षे सेनादलात असलेले व 2012 पासून महाराष्ट्र पोलिस दलामध्ये कॉन्स्टेबल म्हणून असलेले राष्ट्रीय तिरंदाजी प्रशिक्षक चंद्रकांत इलग यांनी तिच्यामधील हुन्नेर आणि जिद्द ओळखून नागपूर पोलिस अकादमीमध्ये धडे दिले. यामुळे अवघ्या दोन वर्षांत ती सुवर्ण पदकाची मानकरी ठरली असून, इतर प्रशिक्षणार्थीसाठी ती आज प्रेरणादायी ठरत आहे.

अ‍ॅथलॅटिस्क ते तिरंदाजीचा यू टर्न
मोनाली ही तशी मुळात अ‍ॅथलॅटिस्क पटू असून, केवळ दोन वर्षांपूर्वी ती तिरंदाजी या क्रीडा प्रकाराकडे वळली आहे. आतापर्यंत तिरंदाजी स्पर्धेतील वेगवेगळ्या पदासह राष्ट्रीय सुवर्ण पदक मिळवित भारतीय संघात स्थान मिळविले आहे. झारखंड येथील अ. भा. पोलिस क्रीडा स्पर्धेत तिने दोन सुवर्ण व कांस्य पदक मिळविले होते. या आधारावर तिची चीनमधील जागतिक पोलिस क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. देशातील विविध स्पर्धेत तिने अव्वल स्थान मिळविल्याने तिची पहिल्यांदाच विश्‍वचषक स्पर्धेसाठी निवड झाली असून, पहिल्या क्रमांकाची रॅक मिळाली आहे. मोनाली ही 50 मीटर कम्पाउंड वैयक्तिक व सांघिक गटात खेळणार आहे. ती रोहतकच्या भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रात महिनाभर अथक सराव आणि तयारी केल्यानंतर आज (ता.5)
चीनसाठी रवाना झाली.

आई अन् भावाची नेहमीच प्रेरणा
मोनाली ही उत्तरोउत्तर यशाला घालत असलेली गवसणीसाठी आई रजनी यांनी कपडे शिवण्याचे काम तर, भाऊ अश्‍विन याने शिक्षण सोडत बहिणीच्या यशासाठी ऑटो रिक्षा चालविण्याचा व्यवसाय स्विकारला. परिस्थितीमुळे आपण शिकू शकलो नाही परंतु, मोनाली तू देशाचे नाव उज्वल कर अशी प्रेरणा सातत्याने तो देत असतो.

आई तू आता विश्रांती घे
वडिलांचे छत्र अवघ्या 18 व्या वर्षी हरविल्याने कुटुंबांची जबाबदारी आईवर आली. दिवसरात्र डोळ्यात तेल घालून आई व भावांने माझ्यासाठी कष्ट केले. प्रशिक्षक इलग सरांनी प्रत्येकवेळी मला प्रेरणा आणि मार्गदर्शन केले. त्यामुळेच मी इथंपर्यंत पोहचले असे भावूक होत, देशासाठी नक्की यश मिळविणार असा विश्‍वास सकाळशी बोलत चीनसाठी दिल्ली येथून आज (ता.5) रवाना झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Monali Chandrabhashra Jadhav Participating for archery From india in china