esakal | यंदा अभियांत्रिकी प्रवेशासाठी लागणार रांगा, १७ हजार जागांसाठी २७ हजार विद्यार्थ्यांनी दिली एमएचसीईटी परीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

more students will go to engineering field in nagpur

गेल्या काही वर्षांत विदर्भातील अभियांत्रिकीसह तंत्रनिकेतन आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या जवळपास निम्म्या जागा रिक्त राहत होत्या. यावर्षी मुंबईसह पुण्यात करोनाचे संकट गंभीर आहे. यामुळे एमएचसीईटी परीक्षा लांबली.

यंदा अभियांत्रिकी प्रवेशासाठी लागणार रांगा, १७ हजार जागांसाठी २७ हजार विद्यार्थ्यांनी दिली एमएचसीईटी परीक्षा

sakal_logo
By
मंगेश गोमासे

नागपूर : कोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्रावर संकट कोसळले. यामुळे विद्यार्थी महाविद्यालयात प्रवेश घेतील काय? अशी परिस्थिती असताना विभागातील ४४ अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या १७ हजार १३६ जागांसाठी २७ हजार २७५ विद्यार्थ्यांनी राज्य सामायिक प्रवेशपूर्व परीक्षा(एमएचटी-सीईटी) दिली आहे. यामुळे अभियांत्रिकी प्रवेशासाठी चांगलीच स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. 

गेल्या काही वर्षांत विदर्भातील अभियांत्रिकीसह तंत्रनिकेतन आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या जवळपास निम्म्या जागा रिक्त राहत होत्या. यावर्षी मुंबईसह पुण्यात करोनाचे संकट गंभीर आहे. यामुळे एमएचसीईटी परीक्षा लांबली. करोनाची भीती व प्रवासाच्या समस्यांमुळे ३० टक्के विद्यार्थ्यांनी सीईटीकडे पाठ फिरविल्याने व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांवर पुन्हा एकदा रिक्त जागांचे संकट ओढवणार, अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, ३० टक्के अनुपस्थितीनंतरही नागपूर विभागातील ४४ अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या उपलब्ध जागांच्या तुलनेत परीक्षार्थींची संख्या ही १० हजारांनी अधिक आहे. यातील काही विद्यार्थी बीएस.स्सी, बी.कॉम. किंवा अन्य व्यवसायिक अभ्यासक्रमाला गेले तरीही उपलब्ध जागा आणि परीक्षार्थींची संख्या मोठी असल्याने प्रवेशासाठी स्पर्धा निर्माण होणार आहे. 

दरवर्षी, नागपूर विभागातील बहुतांश विद्यार्थी हे प्रवेशासाठी पुणे आणि मुंबई येथील महाविद्यालयांना पसंती देतात. मात्र, कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने अनेक विद्यार्थी यंदा विदर्भातील महाविद्यालयांना पसंती देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे यंदा अभियांत्रिकी महाविद्यालयांना चांगले प्रवेश होतील, असाही अंदाज तंत्रशिक्षण विभागाने व्यक्त केला आहे. 

अनेक महाविद्यालयातील प्रवेश फुल्ल - 
कोरोनामुळे सीईटी उशिरा झाली असली तरी बारावीचा निकाल जाहीर होताच नागपूर विभागातील अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. अनेक महाविद्यालयांकडे नोंदणी करून आवश्यक कागदपत्रेही जमा केली आहेत. बहुतांश महाविद्यालयांतील प्रमुख शाखांचे प्रवेश पूर्ण झाले असून नव्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे कठीण झाले आहे. 

१५ टक्के जागा जेईईच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव - 
राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये १५ टक्के जागा या जेईई मेन्स देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. त्यामुळे जेईई परीक्षार्थींना आयआयटीमध्ये प्रवेश न मिळाल्यास या विद्यार्थ्यांना १५ टक्के जागांवर प्रवेश घेता येणार आहे. 

नागपूर विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या सहा जिल्ह्यातील ४४ महाविद्यालयांमध्ये १७ हजार १३६ जागा असून २७ हजार २७५ विद्यार्थ्यांनी सीईटी दिली. त्यामुळे यंदा अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची स्थिती चांगली राहण्याची शक्यता आहे. 

-डॉ. राम निबुदे, विभागीय सहसंचालक, तंत्रशिक्षण. 
 

loading image