चंद्रपुरात "मशीद सबके लिये' उपक्रम; सर्वधर्मीयांची उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 September 2019

चंद्रपूर : मशीद शस्त्र ठेवण्याची जागा नाही, तर प्रार्थनास्थळ आहे. तिथे मुस्लिमांसोबतच सर्वधर्मीय बांधवांसाठी, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सर्वत्र शांतता नांदावी यासाठी प्रार्थना केली जाते. दहशतवादी कृत्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य या पवित्र ठिकाणाहून होत नाही. देशातील काही स्वार्थी लोक धार्मिक भावना भडकवण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर अपप्रचारासाठी करीत आहेत.

चंद्रपूर : मशीद शस्त्र ठेवण्याची जागा नाही, तर प्रार्थनास्थळ आहे. तिथे मुस्लिमांसोबतच सर्वधर्मीय बांधवांसाठी, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सर्वत्र शांतता नांदावी यासाठी प्रार्थना केली जाते. दहशतवादी कृत्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य या पवित्र ठिकाणाहून होत नाही. देशातील काही स्वार्थी लोक धार्मिक भावना भडकवण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर अपप्रचारासाठी करीत आहेत. हिंदू-मुस्लिम तथा इतर धर्मातील तणाव दूर करून सामाजिक सौहार्द टिकविण्यासाठी मेस्कोच्या (मुस्लिम शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना) माध्यमातून गुरुवारपासून सुरू झालेला "मशिद सबके लिये' देशपातळीवर राबविण्याची आवश्‍यकता असल्याचे मत येथे एकत्र आलेल्या सर्वधर्मीय बांधवांनी व्यक्त केले.
मेस्को या संघटनेच्या वतीने येथील छोट्या मशिदीतून "मशीद सबके लिये' या सामाजिक उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. जम्मू- काश्‍मीर राज्यातून 370 कलम मागे घेतल्यानंतर समाजमाध्यमावर मशीदमध्ये शस्त्रे मिळाल्याच्या अफवा पसरविण्यात आल्या होत्या. त्यामुळे अस्वस्थ झालेले मेस्कोचे ऍड. फरहाद बेग यांनी या उपक्रमाला सुरुवात केली.
छोटी मशीदमध्ये दुपारी 4 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत झालेल्या पहिल्या कार्यक्रमाला मुस्लिम, हिंदू, शीख, इसाई, बौद्ध तथा अन्य धर्माचे सुमारे शंभरावर प्रतिष्ठित मान्यवर एकत्र आले होते.
उपक्रमाचे कौतुक
यावेळी छोटी मशीदचे मुफ्ती वलिऊल्ला यांनी मशीदमध्ये नमाज कशा पद्धतीने होते, तेथील ग्रंथालय, शैक्षणिक उपक्रम तथा अन्य सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. यावेळी बंडू धोतरे, मनीष तिवारी, समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, बळीराज धोटे यांनी या उपक्रमाचे कौतुक करीत
हा उपक्रम देशपातळीवर राबविण्याची आवश्‍यकता असल्याचे सांगितले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Mosque Sabake Liye" activities in Chandrapur; Presence of all religions