बुलडाणा : चार मुलींसह विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

शेतात जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेल्या महिलेचे चार मुलींसह गावाशेजारील विहिरीत मृतदेह आढळून आल्याची घटना आज सोमवारी पहाटे नजीकच्या ग्राम माळेगाव ता. मेहकर येथे उघडकीस आल्याने जानेफळ परिसरात एकच खळबळ माजली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

जानेफळ (बुलढाणा) : शेतात जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेल्या महिलेचे चार मुलींसह गावाशेजारील विहिरीत मृतदेह आढळून आल्याची घटना आज सोमवारी पहाटे नजीकच्या ग्राम माळेगाव ता. मेहकर येथे उघडकीस आल्याने जानेफळ परिसरात एकच खळबळ माजली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

उज्वला बबन ढोके (वय ३५ रा. माळेगाव ता. मेहकर), वैष्णवी बबन ढोके (वय ९) , दुर्गा बबन ढोके (वय ७), आरुषी बबन ढोके (वय ४) व पल्लवी बबन ढोके (वय १) यांच्यासमवेत शेतात जात असल्याचे सांगून काल सोमवारी घराबाहेर पडली होती. परंतू रात्री उशिरापर्यंत सुद्धा घरी परतल्या नसल्याने सर्वत्र शोधाशोध करून सुद्धा मिळून आल्या नव्हत्या, त्यामुळे आज सकाळी पुन्हा नातेवाईक व गावकऱ्यांनी शेतातील विहिरींवर जाऊन शोधकार्य सुरु केले असता, गावाशेजारील तुळशीराम चोंडकर यांच्या शेतातील नदीकाठच्या विहिरीत चार मुलींचे प्रेत पाण्यावर तरंगताना आढळून आले. परंतु त्यांच्या आईचे प्रेत मात्र आढळले नाही मात्र पाच जणांच्या चपला त्या विहिरी काठी दिसत होत्या. त्यामुळे परिसरात पोहण्यात तरबेज म्हणून ओळख असलेले जानेफळ येथील तंटामुक्ती अध्यक्ष कृष्णा हावरे, विजय जाधव आदींना सदर घटनेची माहिती कळविण्यात आल्यानंतर त्यांनी माळेगाव येथे पोहोचून विहिरीत उतरत गाळात फसलेल्या उज्वला बबन ढोके यांचा मृतदेह  बाहेर काढला.

या दुर्दैवी घटनेची वार्ता परिसरात वार्‍यासारखी पसरताच सर्वांनीच माळेगावच्या दिशेने धाव घेतल्याने एकच गर्दी जमा झाली होती. मृतक उज्वला बबन ढोके हीचा पती बबन उत्तमराव ढोके याने सुद्धा गेल्या महिन्याभरापूर्वी आत्महत्या केलेली आहे.
सदर घटनेची माहिती पोलीस पाटील वंदना विलास गाढवे यांनी जानेफळ पोलीस स्टेशनला दिल्यानंतर ठाणेदार दिलीप मसराम, बीट जमादार गणेश देडे, पूजा राऊत, अमोल बोर्डे आदींसह घटनास्थळी पोहोचून पंचनामा करीत मृतदेह विहिरीतून बाहेर काढले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mother Suicide with four daughters in buldhana district