esakal | अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना मृत महिलेने केली हालचाल, अन्‌ पुढे.... 
sakal

बोलून बातमी शोधा

dead body

एका महिलेस काही दिवसांपासून ताप आल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्या महिलेचा सोमवारी (ता. 18) सकाळी सहाच्या सुमारास मृत्यू झाला.

अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना मृत महिलेने केली हालचाल, अन्‌ पुढे.... 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती  : बेलपुरा परिसरातील एका महिलेचा (वय 23) उपचारादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. नातेवाइकांनी शवविच्छेदन न करता, मृतदेह घरी नेला. परंतु घरी मृत महिला जिवंत असल्याचा नातेवाइकांना संशय आला. त्यामुळे एकीकडे अंत्यसंस्काराची तयारी केली असताना ती महिला जिवंत झाल्याच्या संशयाने तारांबळ उडाली. 

एका महिलेस काही दिवसांपासून ताप आल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्या महिलेचा सोमवारी (ता. 18) सकाळी सहाच्या सुमारास मृत्यू झाला, असे मृत महिलेच्या नातेवाइकांनी सांगितले. शवविच्छेदनासाठी मृतदेह शवागारात पाठविला. परंतु नातेवाइकांनी शवविच्छेदन न करता, महिलेचा मृतदेह घरी नेला. परिसरात अंत्यसंस्कारासाठी बरीच मंडळी जमली. एवढेच नव्हे तर, हिंदू स्मशानभूमीमध्ये आवश्‍यक ती नोंद केली, अंत्यसंस्काराची सामग्री घरी आणली. परंतु महिलेच्या मृतदेहाजवळ बसलेल्या काही महिलांना महिलेच्या शरीराची थोडी हालचाल झाल्याचा संशय आला. त्यामुळे महिला जिवंत असल्याचे त्यांना वाटले.

अवश्य वाचा- खिशातून पाचशे रुपये काढले म्हणून केला मित्राचा खून...

परिसरातील एका खासगी डॉक्‍टरांना घरी बोलविले. तपासणी करून त्या, डॉक्‍टरनेसुद्धा महिला जिवंत असल्याचेच उत्तर नातेवाइकांना दिली. त्यामुळे नातेवाइकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. अंत्यसंस्काराची तयारी थांबवून महिलेस उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्या रुग्णालयात तपासणीअंती महिलेला मृत घोषित केले. पुन्हा मृतदेह दुपारी तीनच्या सुमारास इर्विन रुग्णालयात आणण्यात आला. इर्विनमध्ये दुसऱ्यांदा महिलेस मृत घोषित करण्यात आले. असे नातेवाइकांनी सांगितले. या घटनेमुळे बेलपुरात एकीकडे अंत्यसंस्काराची तयारी आणि दुसरीकडे निर्माण झालेल्या संभ्रमामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. परंतु कुणी तक्रार नोंदविली नाही. असे राजापेठ पोलिसांनी सांगितले. त्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला. 

बाळ नातेवाइकांच्या स्वाधीन 

संबंधित महिलेला इर्विनमध्ये दाखल करण्यापूर्वी जिल्हा स्त्री रुग्णालयात तिची प्रसूती झाली होती. तिने एका बाळाला जन्म दिला. आता आईचा मृत्यू झाल्यानंतर बाळाला पोलिसांनी आजोबांच्या स्वाधीन केले. 
 

केवळ गैरसमजातून ही घटना घडली. नातेवाइकांनी दुसऱ्यांदा तपासणी केल्यानंतर खात्री पटल्याने त्यांचा गैरसमज दूर झाला.  
- डॉ. श्‍यामसुंदर निकम, जिल्हाशल्य चिकित्सक, अमरावती.