खासदारांची मुख्य सचिवांकडे तक्रार... कोरोनाच्या संकटातही केले जाते राजकारण! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 एप्रिल 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाखाली सर्व देश एकजूट होऊन कोरोना संकटाशी सामना करीत असताना यापुढे अशा प्रकारचे हिन राजकारण होऊ नये, अशी अपेक्षा खासदार मेंढे यांनी व्यक्त केली. जनप्रतिनिधी म्हणून असलेल्या विशेषाधिकाराचे उल्लंघन झाल्यामुळे खासदार मेंढे यांनी राज्य सरकारच्या मुख्य सचिवांकडे सोमवारी (ता.20) याबाबत तक्रार दाखल केली आहे.  

भंडारा : कोरोनासारख्या महाभयंकर संकटाचा सामना करण्यासाठी सर्व पक्षांनी एकजुटीने काम करण्याऐवजी काहीजण तेथेही राजकारण आड आणतात, असा आरोप करून भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील मेंढे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार केली आहे. 

भंडारा- गोंदिया लोकसभा मतदार संघाचा खासदार या नात्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्याचे खासदार सुनील मेंढे यांनी ठरविले होते. त्यासाठी गोंदियाच्या जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांना खासदार मेंढे यांनी 4-5 वेळा फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर खासदार मेंढे यांनी जिल्ह्याधिकारी डॉ. बलकवडे यांना 15 एप्रिल 2020 रोजी सर्व संबंधितांसह सोशल डिस्टन्सिंगचे कठोर पालन करीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्याबाबत लेखी कळविले होते. परंतु, "जिल्हा बंदी'चे कारण देत जिल्हाधिकारी बलकवडे यांनी बैठक आयोजित करण्यास नकार दिला. 

अवश्य वाचा- साहेब, आमचंबी लई नुकसान झालं, आम्हाले कवा मिळणार पीक विमा?

लोकप्रतिनिधीच्या विशेषाधिकाराच्या उल्लंघनाचा आरोप

असे कळते की, सोमवारी (ता.20) खासदार प्रफुल्ल पटेल यांनी गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व शासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यासाठी ते रेड झोनमध्ये असलेल्या मुंबईवरून गोंदिया येथे आले. तसेच दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनीसुद्धा रेड झोनमध्ये असलेल्या नागपूरहून भंडारा येथे येऊन 2-3 वेळा शासकीय बैठकी घेतल्या. यातून राज्य शासनातील सत्ताधाऱ्यांसाठी एक नियम व विरोधकांसाठी दुसरा, असा दुजाभाव झाल्याचे स्पष्ट दिसते. कोरोना विषाणूसारख्या महाभयंकर संकटाशी सामना करताना राजकारण आड येऊ नये, अशी अपेक्षा होती. परंतु दुर्दैवाने ती पूर्ण झाली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाखाली सर्व देश एकजूट होऊन कोरोना संकटाशी सामना करीत असताना यापुढे अशा प्रकारचे हिन राजकारण होऊ नये, अशी अपेक्षा खासदार मेंढे यांनी व्यक्त केली. जनप्रतिनिधी म्हणून असलेल्या विशेषाधिकाराचे उल्लंघन झाल्यामुळे खासदार मेंढे यांनी राज्य सरकारच्या मुख्य सचिवांकडे सोमवारी (ता.20) याबाबत तक्रार दाखल केली आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP complaint to chief secretary... There is dirty politics during corona!