Buldana : सख्ख्या भावाने केला वृद्ध बहिणीचा खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

Buldana : सख्ख्या भावाने केला वृद्ध बहिणीचा खून

चांडोळ : आमच्या तरुण मुलास भानामती करून मारल्याच्या संशयाचे भूत डोक्यात शिरल्याने सख्ख्या भावासह त्याच्या कुटुंबाने ६० वर्षीय वृद्ध बहिणीचा निर्घृण खून केल्याची खळबजनक घटना चांडोळ शिवारात बुधवारी (ता. २८) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी धाड पोलिसांनी चौघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

धाड पोलिसांकडून मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार बुलडाणा तालुक्यातील चांडोळ येथील धनाबाई सुभाष गोमलाडू (६०) यांची पासोडी ते चांडोळ रस्त्यावर मराठवाडा सिमेलगत शेती आहे. धनाबाई गोमलाडू या बुधवारी (ता. २८) शेतामध्ये गेल्या होत्या. परंतु सायंकाळ उलटून गेल्यावरही त्या घरी परत आल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा मुलगा व नातेवाईकांनी गावात, आजुबाजुच्या परिसरात, शेतशिवारात शोध घेतला असता, शामराव राऊत यांच्या शेतातील विहिरीत त्यांना महिलेचे प्रेत तरंगताना दिसून आले.

घटनेची माहिती मिळताच ठाणेदार अनिल पाटील, पोलिस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी महिलेचे प्रेत विहिरीतून बाहेर काढले असता, सदर मृतदेह धनाबाई गोमलाडू यांचा असल्याची ओळख पटली. यावेळी पंचनामा करताना मृतदेहाच्या कपाळावर एका बाजूला जखम दिसून आली व कपाळ चेपलेले दिसले. तसेच अंगातील साडी सुद्धा गायब होती. त्यामुळे या महिलेचा घातपात झाल्याची शंका वर्तवली गेली.

या प्रकरणीची फिर्याद जावई गेंदुसिंग भाउलाल पाकळ यांनी धाड पोलिसांत दिली. त्यावरून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मृत महिलेचा भाऊ असलेला आरोपी हिरालाल रतनसिंग बलावणे, गोपीबाई हिरालाल बलावणे, संजय हिरालाल बलावणे व रंजीत हिरालाल बलावणे या चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केले असून त्यांची कसून चौकशी केली. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम आणि ठाणेदार अनिल पाटील, पो.उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सपो.सचिन पाटील करीत आहे. चांडोळ शिवारात वृध्द महिलेस मारून ज्या विहिरीत फेकण्यात आले. त्या घटनास्थळी सचिन कदम यांनी भेट देऊन पाहणी केली.तसेच तेथे डॉग स्कॉड पाचारण केले.

पंधरा तासाच्या आतच लावला खुनाचा छडा

घटनास्थळी ज्युली नावाच्या डॉग स्कॉडने जमिनीवरील पडलेल्या खुनाच्या डागावरून मृतक महिलेची मारेकर्‍यांनी लपवलेली साडी शोधून काढली. त्यावरून घटनेच्या तपासास गती मिळाली. उपविभागिय अधिकरी सचीन कदम, धाड पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल पाटील, एपीआय सचिन पाटील, पीएसआय प्रमेश्वर केंद्रे, ज्ञानेश्वर काकड,महीला कर्मचारी पो.का. वैशाली कोरडे, डॉगस्कॉडचे राजेश बचीरे, राजेश पदमने, प्रविण गवई, गजानन बगाडे, नितीन चव्हाण सह कर्मचारांनी पंधरा तासाच्या आतच आरोपींच्या मुसक्या आवळल्या.