टेकूचा आधारावर आहे मुरली ग्रामपंचायतची इमारत...केव्हाही कोसळण्याची भीती

सहदेव बोरकर
Sunday, 19 July 2020

दीड हजार लोकसंख्या असलेल्या मुरली गावात प्रशासकीय कामकाज करणाऱ्या ग्रामपंचायतीची इमारत जीर्ण झाली आहे. भिंतींना भेगा पडल्या असून वाकलेल्या भिंतीला लाकडी ओंडक्‍याचा आधार दिला आहे. यामुळे इमारत नावापुरती उभी आहे. भिंतींना आधार दिल्यानंतर इमारतींचे छतही जीर्ण असून त्यालासुद्धा आधार लावण्यात आला आहे.

सिहोरा (जि. भंडारा) : जिल्हा परिषदेत प्रशासक नियुक्ती झाले; तरीही पाच वर्षांपासून मुरली गावातील ग्रामपंचायत इमारतीची समस्या सोडविली नाही. यामुळे गावावर अन्याय केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला असून आता टेकूच्या आधारे मासिक सभा घेण्यात आली. पण, लवकरच ही ग्रामपंचायत बेघर होणार असे चित्र निर्माण झाले आहे.

दीड हजार लोकसंख्या असलेल्या मुरली गावात प्रशासकीय कामकाज करणाऱ्या ग्रामपंचायतीची इमारत जीर्ण झाली आहे. भिंतींना भेगा पडल्या असून वाकलेल्या भिंतीला लाकडी ओंडक्‍याचा आधार दिला आहे. यामुळे इमारत नावापुरती उभी आहे.

भिंतींना आधार दिल्यानंतर इमारतींचे छतही जीर्ण असून त्यालासुद्धा आधार लावण्यात आला आहे. या इमारतीला 35 वर्षे पूर्ण झाली आहेत. रेती मातीच्या भिंती उभ्या करण्यात आल्या आहेत. यामुळे इमारत कधी कोसळेल याचा नेम नाही. परंतु याबाबतीत प्रशासन गंभीर नाही.

गावकऱ्यांत प्रशासन व शासन विरोधात संताप

या गावातील ग्रामपंचायतीच्या इमारतीसाठी आतापर्यंत लोकप्रतिनिधींनी कोणत्याही योजनेतून निधी मिळवून दिला नाही. या गावाने शासनाला महसूल दिला आहे. गावाच्या शिवारात गिट्टीच्या खाणी आहेत. शासनाच्या तिजोरीत महसूल जमा करणाऱ्या गावाची ग्रामपंचायत मात्र, बेघर होण्याच्या मार्गावर आहे. गावातील ग्रामपंचायत इमारतीची अवस्था बघून गावकऱ्यांत प्रशासन व शासन विरोधात संताप आहे. गावागावात विकास होत असताना मुरली उपेक्षित आहे. मासिक सभासुद्धा टेकूच्या आधारावर घेण्याची वेळ येथील पदाधिकाऱ्यांवर आली आहे.

असे का घडले? - इज्जत वाचविण्यासाठी तिने घेतला रुद्रवतार आणि मग काय घडले?

लोकप्रतिनिधींनी इमारत मंजुरी डावलली
ग्रामपंचायत इमारतीला टेकू लावण्याशिवाय पर्याय नाही. याच इमारतीत मासिक सभा व अन्य कामकाज केला जाते. लोकप्रतिनिधींनी इमारत मंजुरीत हेतुपुरस्सर डावलले आहे.
- राजेश बारमाटे, सरपंच, मुरली.
 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murli Gram Panchayat building dilapidated