पावसाची सर आणि अळिंबीच्या भाजीची अविट चव! खवय्यांच्या पडताहेत उड्या

खुशाल ठाकरे
Wednesday, 22 July 2020

अळिंबीला इंग्रजीत मशरूम म्हणतात. याचे बटन मशरूम, शिंपला मशरूम, दुधी मशरूम असे तीन प्रकार असतात. ज्या अळिंबीची भाजी खाल्ली जाते तिला "बटन मशरूम' म्हणतात. अळिंबीची लागवड आपण आपल्या शेतात कंपोस्ट खतांवरही करू शकतो. पण, गडचिरोली जिल्ह्यात नैसर्गिकरीत्या अळिंबी मिळते असून ती अतिशय चवदार आहे.

गडचिरोली : पावसाळा सुरू झाला की रानभाज्यांची मेजवानी सुरू होते. फक्‍त पावसाळ्यात उगवतात अशा अनेक रानभाज्यांवर खवैय्यांच्या उड्या पडतात. या भाज्या चवीला तर उत्कृष्ट लागतातच. शिवाय आरोग्याच्या दृष्टीनेही त्यांचे विशेष महत्त्व असते.

फक्त पावसाळ्यातच काही दिवस मिळणारी दुर्मिळ अळिंबी आता बाजारात आली असून खवय्यांच्या त्यावर उड्या पडत आहेत.

पहिला पाऊस पडला की पालापाचोळा, कचरा, वारूळ, बांबूची बेटे अशा ठिकाणी जंगलामध्ये अळिंबी निघायला सुरुवात होते. अनेक प्रकारच्या अळिंबी असल्या तरी खाण्यायोग्य काहीच प्रजाती असतात. स्थानिकांना त्या बरोबर ओळखता येतात.

अळिंबी निघाली की लोकांची मागणी वाढते. अळिंबी खूप महाग असली, तरी लोकांची मागणी कमी होत नाही. या अळिंबीची किंमत 70 ते 80 रुपये जुडी इतकी असते.
अळिंबीला ग्रामीण भागात "वळंबी' किंवा "वरंबी' असेही म्हटले जाते.

यातील बऱ्याच प्रकारांना सात्या, डुंबर सात्या, अशीही नावे आहेत. बऱ्याच भागांमध्ये अळिंबीची भाजी लोकप्रिय आहे. ही भाजी मुलांपासून तर वृद्धांपर्यंत सगळ्यांच्या आवडीची आहे. काही भागांमध्ये फक्‍त भाजी म्हणून खाल्ल्या जाते. तर काही भागात औषधी म्हणूनही या अळिंबीचा वापर केला जातो.

यात बरीच खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात. इतर भाज्यांच्या तुलनेत अधिक पोषणतत्त्वे यात आहेत. यात कोलीन नावाचे पोषक तत्त्व असते. स्नायूंमध्ये सक्रियता आणि स्मरणशक्‍ती कायम ठेवण्यासाठी फारच फायदेशीर असतो. अळिंबीमध्ये असलेले अँटी ऑक्‍सिडंट आपल्या शरीराला फ्री रॅडिकलपासून वाचवते आणि रक्तदाबासारख्या आजारांना नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

अळिंबीला इंग्रजीत मशरूम म्हणतात. याचे बटन मशरूम, शिंपला मशरूम, दुधी मशरूम असे तीन प्रकार असतात. ज्या अळिंबीची भाजी खाल्ली जाते तिला "बटन मशरूम' म्हणतात. अळिंबीची लागवड आपण आपल्या शेतात कंपोस्ट खतांवरही करू शकतो. पण, गडचिरोली जिल्ह्यात नैसर्गिकरीत्या अळिंबी मिळते असून ती अतिशय चवदार आहे.

सविस्तर वाचा - आजपासून या गावांमध्ये आठ दिवस कम्प्लिट लॉकडाउन!

श्रावणमास होतो खास
सध्या श्रावणमास सुरू झाला आहे. विशेष म्हणजे अळिंबीची भाजी मांसल असून त्याची चव बरीचशी मांसाहारासारखी लागते. त्यामुळे "दुधाची तहान ताकावर' या न्यायाने अनेक मांसाहारी श्रावणमासात या भाजीवर समाधान मानून घेतात. त्यामुळे मांसाहाराची आवड असणाऱ्यांचा शाकाहारी श्रावणमास या भाजीमुळे खास होतो.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mushrooms in rainy season