नागो गाणार म्हणाले, सेवानिवृत्तीच्या वेतनासाठी होते पैशाची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

नागपूर : राज्यातील अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षकांना सेवानिवृत्तीचे वेतन अदा करण्यासाठी शिक्षणाधिकारी व उपसंचालक कार्यालयातून पैशाची मागणी होत असल्याचा आरोप शिक्षक आमदार नागोराव गाणार यांनी केला आहे. 

नागपूर : राज्यातील अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षकांना सेवानिवृत्तीचे वेतन अदा करण्यासाठी शिक्षणाधिकारी व उपसंचालक कार्यालयातून पैशाची मागणी होत असल्याचा आरोप शिक्षक आमदार नागोराव गाणार यांनी केला आहे. 
राज्यात दर वर्षी बरेच शिक्षक सेवानिवृत्त होतात. शिक्षकांना सेवानिवृत्तीचा लाभ तत्काळ मिळणे अपेक्षित असते. मात्र, त्यांना यासाठी सातत्याने शिक्षण विभागाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. कुठले ना कुठले कारण समोर करून वेतन देण्यासाठी विभागाकडून टाळाटाळ करण्यात येते. विशेष म्हणजे, शाळा संचालकांकडून वेतन प्रकरण तयार करण्यासाठी 20 ते 25 हजारांची मागणी करण्यात येते. यानंतर प्रकरण संबंधित कार्यालयात गेल्यावर प्रत्येक वेळी त्रुटी दाखवून प्रलंबित ठेवण्यात येते. यासाठी 10 ते 15 हजारांची मागणी संबंधित कर्मचारी वा अधिकाऱ्याकडून केली जाते. पैसे न दिल्यास प्रकरण शाळेकडे परत पाठविण्यात येते. यासाठी परत शिक्षकांना संचालकांना पैसे द्यावे लागते. या प्रकराने बरेच शिक्षक त्रस्त असल्याचे चित्र आहे. 
यावर शिक्षणाधिकारी व उपसंचालक स्तरावर कुठलेच नियंत्रण ठेवण्यात येत नसल्याचे दिसून येते. हा प्रकार गंभीर आहे. सेवानिवृत्त शिक्षकांचे वेतन प्रकरण तत्काळ निकाली काढावे तसेच पैशे मागणारे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करून भ्रष्टाचार संपुष्टात आणावा, अशी मागणी आमदार नागोराव गाणार यांनी पत्रकातून केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nago Ganar said, the demand for money was for retirement pay