हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

सरकारला नवे वर्ष मुंबईतच साजरे करायचे आहे. 25 डिसेंबरला ख्रिसमसची सुटी आहे. त्यामुळे 16 ते 24 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन होण्याचा अंदाज आहे. 

नागपूर : तब्बल एक महिन्याच्या अस्थिरतेनंतर राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा निकाली निघाला आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या तयारीलाही वेग आला असून डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात म्हणजे 16 डिसेंबरपासून अधिवेशनाचे सत्र सुरू होण्याची शक्‍यता आहे. ते अधिवेशन 24 तारखेपर्यंत चालणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे अधिवेशन फक्त सात दिवसांचेच असणार असल्याचे संकेत आहेत. 

पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जाहीर केल्यानुसार नागपुरातील हिवाळी अधिवेशन हे नऊ डिसेंबरपासून होणार होते. मात्र, निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे सत्तास्थापनेवरून महिनाभर गुऱ्हाळ चालले. राष्ट्रपती राजवटही लावण्यात आली. महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा वाढल्याने हिवाळी अधिवेशनाच्या तयारीची गती मंदावली होती. परंतु, अखेर सेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीची सत्तास्थापन झाली. उद्या गुरुवारी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथविधी घेणार आहे. यामुळे नागपूरला होणाऱ्या 
हिवाळी अधिवेशनाच्या तयारीलाही वेग आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विभागीय आयुक्त संजीवकुमार यांनी आज यासंदर्भात बैठक घेत, तयारी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. घोषित तारखेनुसार नऊ डिसेंबरला होणारे अधिवेशन त्याच दिवसापासून सुरू होण्याची शक्‍यता नाही. जाणकारांच्या मते मंत्रिमंडळाच्या गठनानंतर तीन दिवसांचे विशेष अधिवेशन मुंबईला होईल. त्यानंतर कॅबिनेटच्या बैठकीत किंवा त्याच अधिवेशनात नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख निश्‍चित केली जाण्याची शक्‍यता आहे. विधिमंडळ सचिवालयाला अधिवेशनाच्या तयारीला किमान 15 ते 20 दिवस तरी लागतात. यामुळे नियोजित तारखेपासून अधिवेशन घेणे शक्‍य नाही. त्यामुळेच ते डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्‍यता आहे. 22 डिसेंबरपासून अधिवेशन सुरू केल्यास नवे वर्ष नागपुरात साजरे करावे लागेल. सरकारला नवे वर्ष मुंबईतच साजरे करायचे आहे. 25 डिसेंबरला ख्रिसमसची सुटी आहे. त्यामुळे 16 ते 24 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन होण्याचा अंदाज आहे. 

आढाव्यासाठी अधिकारी पुढील आठवड्यात 
मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतरच हिवाळी अधिवेशनाच्या तयारी संदर्भातील आढावा घेण्यासाठी मुंबई विधिमंडळातील अधिकारी पुढच्या आठवड्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यादृष्टीने नागपुरातील तयारीला जोर चढला आहे. विधानभवनातील इतर तयारी सुरू आहे. मंडप टाकण्यासाठी बांबू महिनाभरापासून येऊन आहेत. येथे नवीन इमारतही तयार करण्यात येत असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शक्‍य तेवढे जास्त काम पूर्ण करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला देण्यात आल्याची माहिती आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, assembly winter session