हनी ट्रॅप : बंटी-बबलीचा अधिकाऱ्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

एक दिवस ती रेड्डी यांच्या फ्लॅटमध्ये शिरली. नको त्या अवस्थेत त्यांच्यासोबत फोटो काढून घेतले.

नागपूर : बबलीने वेकोलि अधिकाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकविले. बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत त्याला ब्लॅकमेल करणे सुरू केले. बबलीने बंटीच्या मदतीने अधिकाऱ्याकडून 15 लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला. वेळीच अधिकाऱ्याने पोलिसांत धाव घेतली. गिट्टीखदान पोलिसांनी बंटी-बबलीच्या गोळजोडीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

या प्रकरणातील 30 वर्षीय बबली गड्डीगोदाम येथील रहिवासी असून सोनाली साखरे, सिमरन शर्मा अशा वेगवेगळ्या नावाने वावरते. मानकापूर येथे राहणारे चिना शुभा माला रेड्डी (30) वेकोलित अधिकारीपदावर कार्यरत आहेत. डिसेंबर 2017 मध्ये दोघांची ओळख झाली. पहिल्याच भेटीत बबलीने त्याच्याशी मैत्री केली. त्यानंतर भेटीगाठी सुरू झाल्या. मोबाईलवरून चॅटिंगही सुरू झाले.

ही महिला "डेंजर' असून, तिने अनेकांना फसविले असल्याने रेड्डी यांना एका मित्राकरवी समजले. यामुळे तिला प्रतिसाद देणे बंद केले. एक दिवस ती रेड्डी यांच्या फ्लॅटमध्ये शिरली. नको त्या अवस्थेत त्यांच्यासोबत फोटो काढून घेतले. ते फोटो कार्यालयीन सहकाऱ्यांना पाठवून बदनामी करण्याची तसेच बलात्काराच्या गुन्ह्यात फसवून नोकरीवरून काढण्याची धमकी दिली. हे सर्व टाळण्यासाठी 15 लाखांच्या खंडणीची मागणी केली. घाबरलेल्या रेड्डी यांनी फ्लॅट सोडून अन्य ठिकाणी राहणे सुरू केले. तरीही ती फोन करून त्रास देत होती.

खोलीत बंद करून मारहाण ​

2018 च्या उन्हाळ्यात आरोपी सोनालीने एका मित्राला रेड्डीकडे पाठविले. त्याच्याकरवी जाफरनगरात बोलावून घेतले. या भेटीतही तिने मित्राच्या मदतीने रेड्डी यांना खोलीत बंद करून मारहाण केली. पुन्हा खंडणीची मागणी केली. तिने रेड्डीकडे असलेले 15 हजार रुपये हिसकावून घेतले होते. काही दिवसांनी त्याच मित्रासोबत सिमरन पुन्हा रेड्डी यांच्या फ्लॅटवर आली. कुलूप तोडून आत प्रवेश केला. यानंतर हा प्रकार नेहमीचा झाला. ती फ्लॅटवर येऊन आरडाओरड करीत निघून जायची. तिच्या त्रासाला कंटाळून रेड्डी यांनी मानकापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्याआधारे पोलिसांनी बंटी, बबलीविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, bunty bubli, crime, blackmail