ताबा कोणी घ्यायचा; "केपी'वर सापडल्या आणखी दोन तोफा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

कस्तुरचंद पार्क येथे तीनही विभागांच्या अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी करणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. विशेष म्हणजे माहिती घेण्यासाठी अधिकाऱ्यांना व विभागाच्या संचालकांना फोन संपर्क करण्यात आला. मात्र प्रत्येकाचेच फोन नॉट रिचेबल होते. 

नागपूर : पुरातन व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कस्तुरचंद पार्क येथे बुधवारी (ता. 27) रात्री आणखी दोन तोफा सापडल्या आहेत. मात्र तोफांचा ताबा नेमका कोणी घ्यायचा याबाबत शासनाच्या तीन विभागांमध्ये संभ्रम आहे. चोवीस तास उलटून देखील तोफा तशाच बेवारस पडून आहेत. 

कस्तुरचंद पार्कचे सौदर्यीकरण सुरू असून, या खोदकामात दीड महिन्यापूर्वी सहा तोफा सापडल्या होत्या. प्रांगणात पादचारी मार्ग बांधण्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. त्यासाठी होत करण्यात आलेल्या खोदकामात दोन तोफा सापडल्या आहेत. प्रथमदर्शनी या तोफा पूर्वीसारख्याच दिसत असून, जमिनीच्या बाहेर काढल्यानंतर त्यावर अजून संशोधन होणे शक्‍य आहे. गुरुवारी ही बाब प्रकाशात आली. त्यानंतर वास्तुतज्ज्ञ अशोक मोखा व इतिहास संशोधकांनी कस्तुरचंद पार्क येथे येऊन पाहणी केली. जमिनीत दडलेल्या या ऐतिहासिक खजिन्याला सन्मानाने बाहेर काढतील अशी प्रत्येकाची अपेक्षा होती; मात्र ताबा नेमका कोणी घ्यायचा, हाच संभ्रम होता. कस्तुरचंद पार्क येथे दिवसभर मनपाचे अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी अन्‌ पुरातत्त्व विभागाचे अधिकारी तळ ठोकून होते. मात्र हा खजिना स्वीकारण्यास प्रत्येकाचाच नकार होता. 

तोफा हलविण्यासाठी वाहन कोणाचे? 
जमिनीत अवघ्या दोन फूट खाली सापडलेल्या तोफ जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढणे आवश्‍यक होते; मात्र नेहमीच नाकर्तेपणाने वागलेल्या पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी जुनाच कित्ता गिरवला. विभागाचे कर्मचारी वेळेत मैदानात दाखल झाले. त्यांनी पाहणी केली; मात्र ताबापत्रावर स्वाक्षरीचे अधिकार ज्या अधिकाऱ्यांकडे होते त्यांनी कस्तुरचंद पार्कपासून दूर राहणेच पसंत केले. 

अधिकाऱ्यांमध्ये धास्ती? 
यंदा लष्कराने या प्रकरणापासून दूर राहणेच योग्य समजले. गुरुवारी तोफ हाताळताना बेसावध राहून चालणार नव्हते. त्यामुळे अधिकारी केवळ उपस्थित होते. प्रत्यक्ष पाहता गेल्या प्रकरणानंतर अधिकाऱ्यांमध्ये धास्ती असल्याचे जाणवत होते. 

कशा असतील तोफा ? 
बुधवारी सापडलेल्या तोफा अन्‌ दीड महिन्यापूर्वी सापडलेल्या तोफा प्रथमदर्शनी सारख्या आकाराच्या असल्याचे जाणवते. पूर्वीच्या तोफा सुमारे दहा फूट लांब व दीड ते दोन फूटांच्या व्यासाच्या आहेत. त्यामुळे यादेखील तशाच असण्याची शक्‍यता आहे. 

 

तोफांचे डिझाइन ब्रिटिशकालीन आहे. ही संपूर्ण युद्धभूमी होती त्यामुळे येथे अशा अनेक वस्तू सापडण्याची शक्‍यता आहे. या भूभागाचे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने शास्त्रोक्त उत्खनन होण्याची गरज आहे. अन्यथा हा वारसा आपण कायमचा गमावू हे निश्‍चित. 
-डॉ. शेषशयन देशमुख, इतिहास संशोधक. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, cannon,