पती सापडला प्रेयसीच्या बाहूपाशात...पत्नीने केले असे की...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

अनैतिक संबंधामुळे एका प्रेमविवाहाचा करुण अंत झाला. हे एखाद्या चित्रपटाचे कथानक नसून नागपुरात घडलेली सत्य घटना आहे. 

नागपूर : स्वीटी (वय 16) ही ट्रेनने जात असताना तिला तहान लागल्यावर विक्‍की (वय 21) याने तिला पाण्याची बाटली दिली. तिने थॅंकू म्हणत त्याला बसायला जागा दिली. दोघांची ओळख झाली आणि नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचल्यानंतर दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेतले. दोघांची चॅटिंग वाढली आणि भेटीगाठी वाढल्या. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. स्वीटीने सोळाव्या वर्षीच विक्‍कीशी पळून जाऊन संसार थाटला. दोन वर्षे सुखाने संसार केल्यानंतर विक्‍कीच्या आयुष्यात आणखी एका तरुणीने एंट्री केली. 

विक्कीचे आणि या तरुणीचे प्रेम प्रकरण बहरू लागले. या दोघांच्या अनैतिक संबंधाची वार्ता स्वीटीपर्यंत पोहोचली. तिने विक्‍कीची समजूत घातली. त्यामुळे काही दिवस प्रेयसीला टाटा-बाय बाय करीत काढले. मात्र, स्वीटी गरोदर असल्यामुळे सासरी गेली. त्यामुळे तो पुन्हा प्रेयसीकडे वळला. पतीचा फोन दोन दिवसांपासून लागत नसल्याचे पाहून स्वीटी थेट त्याच्या प्रेयसीच्या घरी पोहचली. पाहते तर काय विक्‍की प्रेयसीच्या बाहुपाशात होता. अंगाचा तिळपापड झालेल्या स्वीटीने त्या युवतीची यथेच्छ धुलाई केली आणि स्वतः विष प्राशन केले. स्वीटीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अशाप्रकारे अनैतिक संबंधामुळे एका प्रेमविवाहाचा करुण अंत झाला. हे एखाद्या चित्रपटाचे कथानक नसून नागपुरात घडलेली सत्य घटना आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वीटी ऊर्फ वैष्णवी ही नागपुरातील भांडेवाडीत आईवडिलांसह राहत होती. ती दहावीत असताना नागपूरवरून रेल्वेने जात होती. तिची प्रवासादरम्यान विक्‍की शहा (वय 21, रा. चंद्रपूर) याच्याशी ओळख झाली. दोघांच्या प्रवासादरम्यान गप्पा झाल्या. एकमेकांशी मोबाईलने संपर्क आणि मेसेजमुळे संबंध वाढत गेले. स्वीटीशी होत असलेल्या भेटीमुळे प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, स्वीटी अल्पवयीन असल्यामुळे लग्नामध्ये अडचण आली. तसेच तिच्या आईवडिलांपर्यंत विक्‍की आणि स्वीटीचे प्रेमप्रकरण पोहचले. त्यामुळे तिला शाळेत जाण्यास मनाई करण्यात आली. दोघांच्या भेटी कमी झाल्या, परंतु प्रेम वाढले. यावर पर्याय म्हणून दोघांनीही पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. तीन वर्षांपूर्वी दोघेही पळून गेले. काही महिने चंद्रपुरात काढल्यानंतर ते दोघेही नागपुरात परतले आणि पारडीतील अंतुजी नगरात किरायाने राहायला लागले. विक्‍की नागपुरात एका कॅटरिंग कंपनीत कामाला लागला. सर्व काही सुरळीत सुरू होते. परंतु काही कालावधीनंतर या जोडप्याच्या आयुष्यात नवीन तरुणीच्या एंट्रीने या कहाणीने दुर्दैवी वळण घेतले. 

ती आली आणि विपरीत घडले 
स्वीटी पाच महिन्यांची गर्भवती असल्यामुळे तिला विक्‍कीने चंद्रपूरला सासरी पाठविले. गेल्या दोन दिवसांपासून विक्‍की हा फोन उचलत नव्हता. त्यामुळे स्वीटीला संशय आला. ती रविवारी थेट चंद्रपूरवरून नागपुरात आली. तिने नागेश्‍वरनगरात राहणाऱ्या पतीच्या प्रेयसीचे घर गाठले. घराचा दरवाजा ढकलताच दोघेही एकमेकांच्या बाहुपाशात दिसले. 

प्रेयसीची धुलाई आणि घेतले विष 
प्रेयसीवर चिडून असलेल्या स्वीटीने लगेच तिचे केस ओढून बाहेर खेचले. तिची चांगली धुलाई केली. त्यानंतर पतीलाही शिवीगाळ केली. तिने लगेच विष प्राशन केले. प्रेयसीच्या घरी ती बेशुद्ध पडली. त्यामुळे विक्‍की आणि त्याची प्रेयसी घाबरली. प्रेयसीने लगेच काढता पाय घेत पत्नीला घरी नेण्यास बजावले. विक्‍कीने पत्नीला ऑटोने स्वतःच्या रूममवर आणले. घरी नेल्यानंतर पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी तो निघून गेला. मात्र, त्या दरम्यान स्वीटीचा मृत्यू झाला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, crime, love traingle