जगायचे कसे? घटता व्याजदर वाढवितोय ज्येष्ठांचा "बीपी'

योगेश बरवड
रविवार, 8 डिसेंबर 2019

मिळणारे व्याज कमी झाल्याने आयुष्याच्या सायंकाळी ज्येष्ठ नागरिकांवर संकट ओढवले आहे.

नागपूर : व्याजदरात सातत्याने घसरण होत आहे. कर्ज स्वस्त झाल्याने कमावता वर्ग खुश आहे. त्याचवेळी घटत्या व्याजदरामुळे आयुष्याची शिल्लक बॅंकेत ठेवून गुजराण करणाऱ्या ज्येष्ठांची मासिक किंवा वार्षिक मिळकत कमी कमी होत आहे. व्याजदरावर टीडीएसही कापला जात असल्याने ज्येष्ठांचा बीपी वाढत आहे. महागाईच्या दिवसात जगायचे तरी कसे? असा सवाल ज्येष्ठ नागरिक करीत आहेत. 

बॅंकांच्या ठेवींवर मिळणारे व्याज कमी होत आहे. आयुष्यभर कष्ट उपसून उभारलेला निधी आणि निवृत्तीनंतर मिळणारा पैसा बॅंकेत ठेवून त्यावर मिळणाऱ्या व्याजातून पैशातून गुजराण करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण, मिळणारे व्याज कमी झाल्याने आयुष्याच्या सायंकाळी ज्येष्ठ नागरिकांवर संकट ओढवले आहे. पाच वर्षांत ठेवीची रक्कम दुप्पट होण्याचा काळ अनेकांनी बघितला आहे. नंतर व्याजदरात घट होत गेली. 2015 मध्ये 8.5 टक्के दराने व्याज मिळत होते. सध्या व्याजाचा दर 6.75 टक्के आहे. सहकारी बॅंकांमध्ये अर्धा टक्का अधिक व्याजदर मिळत असला तरी त्यात जोखीम अधिक आहे. यामुळे राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्येच ठेवी ठेवण्यावर नागरिकांचा भर असतो. 

व्याज करमुक्त करण्याची मागणी 
आयुष्यभर कष्ट करताना मिळणाऱ्या उत्पन्नावर कर द्यावाच लागतो. पूर्वीच कर दिलेला हा पैसा बॅंकेत ठेवल्यास मिळणाऱ्या व्याजावर पुन्हा टीडीएस स्वरूपात कर कपात केली जाते. एकाच रकमेवर डबल कर कपात करणे अन्यायकारक आहे. यामुळे ज्येष्ठांच्या ठेवींवर मिळणाऱ्या व्याजावर टीडीएस कापला जाऊ नये, अशी जुनी मागणी आहे. पण, त्याकडे सरकारकडून सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. 

औषधे खायची की पोटाची खळगी भरायची? 
कवेलू क्वॉर्टर, दर्शन कॉलनी येथील रहिवासी सुनीता ढोमणे आज 62 वर्षांच्या आहेत. त्यांचे पती त्यावेळेच्या एमएसईबीमध्ये कार्यरत होते. पेन्शन मिळणार नसल्याने निवृत्तीनंतर मिळालेली रक्कम बॅंकेत ठेवली. पूर्वी वार्षिक 50 हजारांच्यावर व्याज मिळत होते. मुलं कमावती असल्याने गुजराण व्हायची. पण, आता वार्षिक व्याज 40 हजारांपेक्षाही कमी झाले आहे. महागाईमुळे मुलांनी कमावलेला पैसा त्यांनाच पुरत नाही. अडचणीच्यावेळी त्यांनाही मदत करावीच लागत असल्याचे सांगतानाच औषधे खायची की पोटाची खळगी आधी भरायची, असा भावनिक प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. 

परतावा कमी मिळणे म्हणजेच आवक कमी झाल्याने नाइलाजास्तव दैनंदिन खर्चात काटकसर करावी लागत आहे. औषधोपचार व अन्य खर्चांसाठी मुलांवर अवलंबून राहण्याशिवाय ज्येष्ठांपुढे दुसरा पर्याय नाही. अधिक व्याजदर मिळाल्यास नक्‍कीच त्यांचे जीवनमान उंचावून त्यांना आयुष्याचे उर्वरित दिवस आनंदात घालविता येतील. 
-बबनराव वानखडे, अध्यक्ष, पूर्व विदर्भ प्रादेशिक विभाग (फेस्कॉम) नागपूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, elder, old people, bank, money, interest