नागपूर : मुलींसाठी वनविभागात ‘चॅलेंजिंग जॉब' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur forest department job

नागपूर : मुलींसाठी वनविभागात ‘चॅलेंजिंग जॉब'

हिंगणा : स्पर्धेच्या युगात महिला आता सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. राज्याच्या वन विभागातही वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून काम करणे मुलींसाठी ‘चॅलेंजिंग जॉब’ आहे. सद्यस्थितीत नागपूर विभागातील १४ रेंजपैकी ५ रेंजमध्ये महिला वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यरत असल्याची माहिती हिंगणा वनपरिक्षेत्र अधिकारी रिना राठोड यांनी दिली.

राज्यातील वनविभागात २००५ पर्यंत केवळ कार्यालयातील कामकाजात महिलांचा समावेश होता. २००६ मध्ये वन विभागात क्षेत्रीय कामात मुलींना संधी देण्यासाठी सरळसेवा भरती करण्यात आली. यामुळे वनविभागात महिला अधिकारी होण्याचे प्रमाण वाढले. विज्ञान शाखेतील पदवीधरांना वन विभागात अधिकारी होण्याच्या परीक्षेला बसावे लागते. नंतर वनविभागात पदोन्नतीसाठी परीक्षा घेतली जाते. सर्वप्रथम क्षेत्र सहाय्यक म्हणून वन विभागात रुजू झाले. या दरम्यान यवतमाळ व दिग्रस येथे काम करण्याची संधी मिळाली.

वन विभागाची पदोन्नतीची परीक्षा दिल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून पदोन्नती झाली. यानंतर हिंगणा वनपरिक्षेत्रात नियुक्ती करण्यात आली. चार भिंतीच्या आड असलेल्या शासकीय कार्यालयात महिला मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. मात्र वन विभागात क्षेत्रीय काम करताना महिला अधिकाऱ्यांना ‘चॅलेंजिंग’ काम केल्यासारखे वाटते. २५ ते ३० लोकांचा स्टाफ सांभाळताना ‘सेल्फ कॉन्फिडन्स’ वाढतो.

वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड पुढे म्हणाल्या, नागपूर वन विभागात १४ रेंज आहेत.यातील ५ रेंजमध्ये महिला वनपरिक्षेत्र अधिकारी उत्कृष्ट काम करीत आहेत. केवळ रात्रीची गस्त करताना इतर महिला कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन गस्त करावी लागते. आव्हानात्मक काम करण्याची संधी आहे. यामुळे मुलींनी या क्षेत्रात नवी संधी म्हणून यावे. हिंगणा वनपरिक्षेत्र १४ हजार ५०० हेक्टरमध्ये विस्तारले आहे. यात राखीव वनक्षेत्र, संरक्षित वनक्षेत्र व झुडपी जंगलाचा समावेश आहे. वाघ, बिबट, हरीण, रोही, रानडुक्कर, मोर यासह इतर वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आहे. वाघांची संख्या दिवसागणिक या वनपरिक्षेत्रात वाढत आहे.

शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा !

पठारावरील भाग बोर अभयारण्याला लागून आहे. यामुळे रानडुक्करांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. ज्या शेतकऱ्यांची नुकसान वन्यप्राणी करत असतील तर अशा शेतकऱ्यांनी वन विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, जेणेकरून वन विभागाकडून मिळणारी मदत शेतकऱ्यांना तातडीने मिळेल. याबाबत काही अडचणी असल्यास शेतकऱ्यांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा, असे सरते शेवटी वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांनी सांगितले.