

नागपूर: महाविकास आघाडीत विधानसभा मतदार संघावरून पेच निर्माण झाला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ही जागा सोडणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मात्र, आघाडीत बिघाडी होऊ नये म्हणून पक्षाने माघार घेतली. आता नागपूर शहरात काँग्रेस सर्व सहा मतदारसंघांत लढणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले. येथील निश्चित केलेल्या उमेदवारांना काँग्रेसने तयारीत राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही उमेदवारांनी प्रचारालाही सुरवात केलेली आहे.
महाविकास आघाडीत नागपूरच्या जागेवरून मोठ्या घडामोडी घडल्या. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून वाटाघाटी केल्या. त्यानंतर दक्षिण नागपूरमध्ये काँग्रेसच लढणार असल्याचे शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे दक्षिणेतील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. दक्षिण नागपूरमध्ये २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया यांनी बंडखोरी केली होती.