संभल जा, वरना तुझे ठोक देंगे! अतिक्रमणावरून नागपुरच्या महापौरांना धमकी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

कारवाई करताना महापालिकेचे पथकही अतिरेक करीत आहे. अधिकृत बाजारात भाजीविक्रेत्यांनाही बसू दिले जात नसल्याने व्यावसायिक भडकले आहेत. 

नागपूर : महापौर संदीप जोशी यांनी रस्ते, फुटपाथ व फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाविरोधात कडक भूमिका घेतल्याने शहरात चांगलाच तणाव निर्माण झाला आहे. एका दुकानदाराने सूचनापेटीत चक्क महापौरांना धमकी देऊन अतिरेक केला आहे. याविरोधात बजाजनगर पोलिस ठाण्यात धमकी दिल्याची तक्रारसुद्धा महापौरांच्यावतीने नोंदवण्यात आली आहे. धोरणावर एकमत करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या महापालिकेच्या विशेष बैठकीत भाजप आणि कॉंग्रेसमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. जागनाथ बुधवारीत व्यापाऱ्यांनी कारवाईला विरोध करून निदर्शने केली. 

महापौर संदीप जोशी यांनी शहरातील समस्या व अपेक्षांसाठी नागरिकांना आपले मत मांडण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शहरातील रस्ते व फुटपाथवरील अतिक्रमण विरोधात सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ते हटवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. त्यानुसार अतिक्रमण हटवण्यास प्रारंभ झाला आहे. या संदर्भात सर्वच पक्षाच्या नगरसेवकांना विश्‍वासत एक धोरण ठरवण्यासाठी शनिवारी विशेष बैठक बोलावण्यात आली. यात एकमत होण्याऐवजी खडाजंगी झाली. रोज सुरू असलेल्या धडक कारवाईने रस्त्यावर व्यवसाय करणारे छोटे-छोटे दुकानदार चांगलेच भडकले आहेत. दुसरीकडे कारवाई करताना महापालिकेचे पथकही अतिरेक करीत आहे. अधिकृत बाजारात भाजीविक्रेत्यांनाही बसू दिले जात नसल्याने व्यावसायिक भडकले आहेत. 

महापौरांनी केली तक्रार 
संदीप तुझे समझा रहे है. हिसाब से काम कर. बहोत गरम चल रहा है तू. और अगर हमारी जिदंगी खराब हुई, अगर हमारा कुछ भी नुकसान हुआ तू सोच भी नही सकता तेरा क्‍या हाल होगा. तेरी जिंदगी बरबाद कर दुंगा. तेरा भी परिवार है. संभल जा. वर्णा ठोक देंगे तुझे. और इस वॉर्निंग को हलके मत ले...अशी धमकी एका अज्ञाताने दिली. सदर येथील हल्दीराम हॉटेलजवळ असलेल्या मेश्राम चौकातील तक्रार पेटीत हे धमकीपत्र टाकण्यात आले आहे. या विरोधात संदीप जोशी यांनी बजाजनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, mayor sandip joshi, warning, crime