आता रंगणार "स्ट्रक्‍चरल ऑडिट'चा खेळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

या घटनेत जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे. 

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) टीबी वॉर्ड परिसरातील चर्मरोग विभागाच्या इमारतीला अंदाजे 30 वर्षे झाली आहेत. या ठिकाणी आधी मेडिसीनचा वॉर्ड होता. 2014 मध्ये चर्मरोग विभागाकडे ही इमारत हस्तांतरित करण्यात आली. इमारत जीर्ण झाल्यानंतरही या इमारतीचे "स्ट्रक्‍चरल ऑडिट' झाले नसल्याची बाब पुढे आली. या इमारतीचा पोर्च कोसळून दोघांना जीव गमवावा लागला. जीवहानीच्या या दुर्दैवी घटनेनंतर मेडिकल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आता "स्ट्रक्‍चरल ऑडिट'चा खेळ खेळला जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे या घटनेत जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे. 

मेडिकलमध्ये घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे तत्काळ घटनास्थळी पोहोचले. मृतांविषयी माहिती जाणून घेतली. सर्जरी विभागाच्या कॅज्युल्टीपासून तर ट्रॉमातील परिस्थितीची माहिती घेतली. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी या घटनेची नोंद घेत पंचनामा केला. या प्रकरणाची चौकशी पोलिसांमार्फत होईल. परंतु, या घटनेत ठार झालेले देवनाथ बागडे आणि वनिता वाघमारे या दोघांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. 

मेडिकलमध्ये रुग्ण, त्यांच्या नातेवाइकांसह परिचारिका, परिचर तसेच डॉक्‍टर अशा पंचवीस हजारांवर व्यक्तींचा दररोज वावर असतो. या सर्वांची सुरक्षा ध्यानात घेता आगामी काळात जीर्ण इमारतींसह सार्वजनिक बांधकाम विभागाने नव्याने बांधलेल्या इमारतींचेही "स्ट्रक्‍चरल ऑडिट' करण्यात येईल. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देण्यात येईल. 
- डॉ. सजल मित्रा, अधिष्ठाता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, medical, accident, structual audit