थरार..! त्याची हालचाल थांबेपर्यंत आरोपी फटके हाणतच होते

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

शुभमने रागाच्या भरात पिंटूच्या कानशिलात लगावल्या होत्या. परिसरातील लोक धावून आल्याने दोघेही आपापल्या वाटेने निघून गेले. पण, पिंटूच्या डोक्‍यात राग धुमसतच होता.

नागपूर : दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादाचा वचपा म्हणून 14 ते 15 जणांनी लोखंडी रॉड आणि लाकडी राफ्टरचे फटके हाणून एकाचा खून केला तर त्याच्या दोन साथीदारांना गंभीर जखमी केले. गुरुवारी रात्री पाचपावली हद्दीत बांगलादेश, खाटीकपुरा भागात हे थरारक हत्याकांड घडले. 

शुभम सदावर्ते (18) रा. बावरी विहिरीजवळ, चकना चौक असे मृताचे तर पवन धार्मिक (18) रा. लालगंज, मेहंदीबाग व पीयूष आगडे अशी जखमी मित्रांची नावे आहेत. 3 डिसेंबरला शुभम आपल्या मोटारसायकलने जात असताना या हत्याकांडाचा सूत्रधार पिंटू बेंडेकर याला धक्का लागला होता. याच कारणावरून दोघांमध्ये कडाक्‍याचे भांडणही झाले. शुभमने रागाच्या भरात पिंटूच्या कानशिलात लगावल्या होत्या. परिसरातील लोक धावून आल्याने दोघेही आपापल्या वाटेने निघून गेले. पण, पिंटूच्या डोक्‍यात राग धुमसतच होता. घटनेचा वचपा काढायचाच असा मनोमन निश्‍चय त्याने केला होता. अन्य साथीदारांनाही घटनेची माहिती देत शुभमला धडा शिकविण्यासाठी षड्‌यंत्र रचले आणि ते संधीच्या शोधात होते. गुरुवारी पिंटूने फोन करून शुभमला भांडण मिटविण्यासाठी बांगलादेश येथे बोलावून घेतले. पिंटू बेंडेकर, त्याचा भाऊ जितेश बेडेकर, आकाश माहुरे, बादल पडोळे, मंगेश ऊर्फ बजरंगी चिरोडकर, सुशांत ऊर्फ लल्ला सोनकुसरे, विक्की ऊर्फ बुटाया, आकाश ऊर्फ बुटाऱ्या कुंभारे, विक्की ऊर्फ कावळा, यश ऊर्फ दौला, कृष्णा व त्यांचे अन्य साथीदार दबा धरून बसले होते. रात्री 10 वाजताच्या सुमारास शुभम हा आपल्या दोन मित्रांसह तिथे पोहचला. त्याने घटनेबाबत दिलगिरी व्यक्त करीत पिंटूची माफीही मागितली. त्याचवेळी पिंटू व त्याच्या साथीदारांनी तिघांवरही हल्ला चढविला. 

हातबुक्की, लाथ, लोखंडी रॉड आणि लाकडी राफ्टरने फटके हाणणे सुरू केले. यात पीयूषच्या उजव्या पायाला तर पवनच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. यानंतर सर्वच आरोपी शुभमवर तुटून पडले. वर्मी घाव बसल्याने शुभमचा मृत्यू झाला. त्याची हालचाल थांबेपर्यंत आरोपी फटके हाणतच होते. तो कोणतीही हालचाल करीत नसल्याचे लक्षात येताच, आरोपी घाबरले आणि घटनास्थळावरून पळून गेले.

परिसरात तणावाचे वातावरण

घटनेची माहिती मिळताच पाचपावली पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. तातडीने जखमी मित्रांना रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीने खुनाचा गुन्हा दाखल करून घेत आरोपींचा शोध सुरू केला. तत्काळ सात आरोपींना ताब्यात घेतले. त्यातील पिंटू आणि आकाशला अटक करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, murder, crime