नदी स्वच्छता अभियानावरून पेच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मे 2019

नागपूर : शहरातील तिन्ही नद्यांची स्वच्छता रविवारपासून सुरू होणार आहे. परंतु, अद्याप उपयुक्त यंत्रसामग्रीची जुळवाजुळव न झाल्याने मनपा प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत राबविण्यात आलेल्या नदी स्वच्छता मोहिमेच्या तुलनेत यंदा गती मंदावल्याचे तसेच निरुत्साहाचे चित्र दिसून येत आहे.

नागपूर : शहरातील तिन्ही नद्यांची स्वच्छता रविवारपासून सुरू होणार आहे. परंतु, अद्याप उपयुक्त यंत्रसामग्रीची जुळवाजुळव न झाल्याने मनपा प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत राबविण्यात आलेल्या नदी स्वच्छता मोहिमेच्या तुलनेत यंदा गती मंदावल्याचे तसेच निरुत्साहाचे चित्र दिसून येत आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही रविवार, 5 मेपासून महिनाभर नदी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. नाग, पोरा व पिवळी नदीच्या 50 किमी पात्राच्या स्वच्छतेसाठी 15 पोकलेन, 10 टिप्पर, 12 जेसीबीची गरज भासणार आहे. याशिवाय फावडे, टिकास आदी सामग्रीही मोठ्या प्रमाणात लागणार आहे. मागील वर्षी 30 लाख रुपयांचे डिझेल खर्च केले होते. यंदाही एवढ्याच रुपयांच्या डिझेलची गरज भासणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही यंत्रणा उभारणीसाठी मनपाने शहरातील शासकीय, निमशासकीय तसेच खासगी संस्थांकडूनही मदतीची अपेक्षा केली होती. महिन्याभरापूर्वी आयुक्तांनी घेतलेल्या बैठकीत वेकोलिचे बी. टी. रामटेके, "क्रेडाई'चे गौरव अग्रवाल, एसएमएस इन्ड्युरन्स लिमिटेडचे डॉ. किशोर मालवीय, विश्‍वराज इन्फ्रास्ट्रक्‍चरचे श्रीकांत समरूतवार, महामेट्रोचे महेश गुप्ता, मो. शफीक, एनएचएआय पीआययूझेडचे स्वप्निल कसार, राजन पाली, डी. पी. वर्मा, एमआयडीसीचे के. टी. बोंद्रे, राहुल तिडके, मंगल कार्यालय असोसिएशनचे संजय काळे, विजय तलमले, कनक रिसोर्सेस मॅनेजमेंटचे कमलेश शर्मा, कुशाल वीज, नागपूर सुधार प्रन्यासचे मनोहर जीवनकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे जी. डी. जिद्देवार, हल्दीराम समूहाचे दीपक पांडे उपस्थित होते. परंतु, यातील काहीच संस्थांनी आतापर्यंत मदतीचा हात पुढे केला. अनेक संस्थांनी अद्याप मनपाशी संपर्क साधला नसल्याने यंत्रसामग्रीवरून प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. उद्या, शुक्रवार तसेच त्यानंतर शनिवार, असे केवळ दोन दिवस महापालिकेकडे आहेत. रविवारपासून मोहीम असल्याने आज सायंकाळी अधिकाऱ्यांनी आढावा घेतला. यात अजून पुढे न आलेल्या संस्थांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली.  
उद्‌घाटन कुणाच्या हस्ते?
दरवर्षी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते मोहिमेला सुरुवात केली जाते. मात्र, सध्या लोकसभा निवडणूक आचारसंहिता असल्याने या मोहिमेची सुरुवात कुणाच्या हस्ते होणार, याबाबत प्रशासनही मौन बाळगून आहे. पालकमंत्री, महापौर कार्यक्रमाला न आल्यास नगरसेवक व इतर पदाधिकारीही नदी स्वच्छतेकडे पाठ फिरवतील. त्यामुळे मोहिमेचा बोजवारा उडण्याची भीतीही काही अधिकारी व्यक्त करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur nagnadi news