नाना पटोले म्हणाले, हिवाळी अधिवेशनाचा नागपूर करार पाळणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

मंत्रीच नव्हे तर मुख्यमंत्र्यांनाही निर्देश देण्याचे अधिकार अध्यक्ष या नात्याने आपल्याला मिळाले आहेत. याचा वापर शेतकरी आणि वैदर्भीय जनतेला न्याय देण्यासाठी केला जाईल. 

नागपूर : हिवाळी अधिवेशनात प्राधान्याने वैदर्भीयांच्या समस्या, प्रश्‍न मार्गी लागाव्या आणि नागपूर कराराप्रमाणे अधिवेशन पूर्णकाळ गंभीरपणे चालवण्याची ग्वाही विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत दिली. या दरम्यान त्यांनी वैदर्भीयांवर अन्याय होऊ देणार नाही, वैद्यकीय साहाय्यता निधी योजना सुरू ठेवण्याची जबाबदारी सरकारची असल्याचेही सांगितले. 

सोळा डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज आधीच ठरले होते. त्यानुसार तारांकित प्रश्‍नोत्तराचा तास होणार नाही. त्यात आता फारसा बदल करणे शक्‍य नाही. मात्र, आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून अनेक बदल करण्यात येतील. सर्व सदस्यांना बोलता यावे, प्रश्‍न उपस्थित करता यावे आणि सर्वसामान्यांच्या समस्यांना न्याय मिळावा असा प्रयत्न केला जाणार आहे. याशिवाय अधिवेशनाचे कामकाज सुरळीत चालावे, गोंधळ कमी व्हावा याही दिशेने सुधारणा करण्यात येणार आहे. 

मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळणारे 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी माझा जुना संबंध आहे. ते जे बोलतात ते करतात. त्यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज नाही. राज्यावर सहा हजार कोटींचे कर्ज असले तरी त्यातून कसा मार्ग काढायचा आणि शेतकऱ्यांना मदत कशी द्यायची हे सरकारचे काम आहे. 

विदर्भाचा आवाज वाढला 
अध्यक्ष करून आपला आवाज दाबण्यात आला असे वाटत नाही का? या प्रश्‍नावर पटोले यांनी उलट आवाज वाढविला असल्याचे सांगितले. सर्व मंत्रिमंडळ अध्यक्षांच्या अखत्यारित येते. मंत्रीच नव्हे तर मुख्यमंत्र्यांनाही निर्देश देण्याचे अधिकार अध्यक्ष या नात्याने आपल्याला मिळाले आहेत. याचा वापर शेतकरी आणि वैदर्भीय जनतेला न्याय देण्यासाठी केला जाईल. 

मी छोट्या राज्यांचा पुरस्कर्ता 
आमचे सरकारच्या वचननाम्यात स्वतंत्र विदर्भाचा उल्लेख नव्हता. त्यावर सभागृहाबाहेर टिपणी करणे योग्य नाही. सभागृहात कोणी विषय उपस्थित केला तर त्यावर भूमिका जाहीर केली जाईल. छोटे राज्य विकास आणि प्रशासकीयदृष्ट्या सोयीचे असतात. त्यामुळे आपली वैयक्तिक भूमिका छोट्या राज्यांची असल्याचे पटोले यांनी सांगितले. 

जय वाघामुळे गोसेखुर्दला चालना 
काही अधिकाऱ्यांना फाइलवर "खुट्या' मारण्याची सवयच असते. जंगलाचे कारण देऊन वनविभागाने अनेक सिंचन प्रकल्प रोखून ठेवले होते. जयचंद वाघ गायब झाल्यानंतर आपण केंद्राच्या वन व पर्यावरण समितीचा सदस्य असताना हा विषय बैठकीत उपस्थित केला. तेव्हा वनाधिकारी घाबरले. त्यानंतर विनाकारण रोखून ठेवलेल्या विदर्भातील प्रकल्पाच्या फाइली हलायला लागल्या. गोसेखुर्दच्या कामाची गती याच कारणामुळे वाढल्याचा दावाही यावेळी नाना पटोले यांनी केला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, nana patole, winter assembly session