जिल्हा, ग्रामीण रुग्णालयात हवे "जेरियाट्रिक सेंटर'

केवल जीवनतारे
बुधवार, 28 मार्च 2018

नागपूर - 'सुनेनं सांगितलं जी, "बाबा बाल्कनीतच बसून राहायचं.' मी तसा बसून राहतो. सकाळी साडेदहालाच बाल्कनीत उन्हाचा तडाखा बसतो. मग आत येतो. आत आलो की घरातील मंडळींचा चेहरा पडतो. माझं मलाच चुकल्यासारखं वाटतं. घरात वादाला तोंड फुटू नये म्हणून मग बागेत येऊन बसतो. बागेत किती वेळ बसायचं. मनावर परिणाम होतो. आता तुम्हीच सांगा... आम्ही कसे दिवस काढायचे?'', सायंकाळी बागेत बसलेले रतिरामजी, जागेश्‍वरजी, नत्थुराम, चरणदास, भाऊराव असे सारेच वृद्ध एकामागोमाग आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत होते.

वयोमानानुसार हाडे ठिसूळ होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होते. यावर नागपूरच्या स्काय ऑर्थोपेडिक ऍण्ड स्पाईन क्‍लिनिकलने अभ्यास केला. साठीनंतर वृद्धांमध्ये स्नायूंच्या मांसपेशींची ताकद कमी होणे, उभे राहताना तोल जाणे, कंबर, पाठ, गुडघे, मणक्‍यासह शरीराच्या सांध्यात वेदना होणे आदी त्रास वाढत असल्याचे निदर्शनास आले. शंभर रुग्णांमध्ये सरासरी 40 पुरुष, तर 60 महिलांमध्ये हा आजार आढळून आला. हाडे ठिसूळ झाल्याने साधा धक्का लागला, तरी पाठीचा मणका तुटण्याचा धोका संभवतो, असे डॉ. आकाश सावजी यांनी सांगितले.
ज्येष्ठांना आरोग्यदायी सुविधांसाठी सरकारने मोफत लसीकरण, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रापासून, तर तालुका आणि जिल्हा पातळीवर ज्येष्ठांच्या उपचारासाठी स्वतंत्र "जेरियाट्रिक सेंटर' (वृद्धापकाळ केंद्र) उभारण्याची गरज आहे. ज्येष्ठांच्या उपचारासाठी स्वतंत्र यंत्रणा यामार्फत उभी होईल, असा सूर डॉक्‍टरांशी केलेल्या चर्चेतून पुढे आला. नागपूरच्या मेडिकलमध्ये मंजूर झालेले "जेरियाट्रिक सेंटर' दोन वर्षांनंतरही थंडबस्त्यात आहे, असेही डॉक्‍टरांनी सांगितले.
वृद्धापकाळ योजना थंडबस्त्यात

वृद्धापकाळ योजना बासनात
केंद्र सरकारद्वारे संचालित जेरियाट्रिक केयर (वृद्धापकाळ योजना) योजना राष्ट्रीय आरोग्य अभियाना(एनआरएचएम) अंतर्गत राबविली जाते. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या देखरेखीत या योजनेतून वृद्धांना व्यायाम यंत्र उपलब्ध करून दिले जाते. नागपूर जिल्ह्याचा विचार करता येथील एक हजार 255 गावांची निवड झाली होती. प्रत्येक गावात तीन स्वयंसेवकही नेमले गेले होते. स्वयंसेवकांवर वृद्ध लाभार्थ्यांना प्रशिक्षणाची जबाबदारी सोपविली होती. गेल्या वर्षी या योजनेसाठी 20 लाख 8 हजारांचा निधी दिला गेला. मात्र, "एनआरएचएम' योजनेचा आढावा घेणाऱ्या बैठकीत या योजनेबद्दल विचारणा झाल्यानंतर संबंधित विभागाच्या पदाधिकाऱ्यास अशी योजनाच माहिती नसल्याचे तथ्य पुढे आले.

ज्येष्ठांचे आरोग्य...
- स्वतंत्र उपचार यंत्रणा असावी
-नागपूरमधील जेरियाट्रिक सेंटर थंडबस्त्यात
-75 टक्के वृद्धांना कंबर, पाठ, गुडघेदुखी
-पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण यात अधिक
- मोफत लसीकरणाची गरज

ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी लसीकरण लाभदायी आहे. वेगवेगळ्या रोगांवर प्रतिबंधात्मक लस आहे. यासंदर्भात आपल्या देशात जनजागृती नाही. यामुळेच बरेचशे ज्येष्ठ डॉक्‍टरही स्वतःही लसीकरण करीत नाही. यामुळेच ज्येष्ठांना लसीकरणाबाबत कोणी सांगत नाही. हे चित्र हळूहळू बदलेल.
- डॉ. संजय बजाज, जेरियाट्रिक तज्ज्ञ, नागपूर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur news district rural hospital geriatric center old people