मेलो असतो तर पैसे मिळाले असते

विनोद पिल्लेवान
गुरुवार, 18 जानेवारी 2018

उमरेड - एकूण २५ मिनिटांचा थरार.. जीव वाचविण्यासाठी दोघांचीही धडपड... बिबट्याच्या पोटात भुकेची पेटलेली आग... या झुंजीची कहाणी राजेंद्र ठाकरे (वय ५५) सांगतात तेव्हा अंगावर सर्रकन काटा उभा राहतो... नागपुरातील मेडिकल रुग्णालयात त्यांनी या थराराची माहिती दिली. ती त्यांच्याच शब्दात-

उमरेड - एकूण २५ मिनिटांचा थरार.. जीव वाचविण्यासाठी दोघांचीही धडपड... बिबट्याच्या पोटात भुकेची पेटलेली आग... या झुंजीची कहाणी राजेंद्र ठाकरे (वय ५५) सांगतात तेव्हा अंगावर सर्रकन काटा उभा राहतो... नागपुरातील मेडिकल रुग्णालयात त्यांनी या थराराची माहिती दिली. ती त्यांच्याच शब्दात-

वेळ असेल सकाळी सातची. रात्रभर शेतात जागली केल्यानंतर लहान भाऊ रवींद्र बैल सोडायला गेला. या वेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर मागून झेप घेतली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे तो जिवाच्या आकांताने ओरडला. बाजूच्या शेतात मी होतो. तेथून धावत आलो. तोपर्यंत रवींद्रने बिबट्याला पळवून लावले होते, पण जनावर जवळपासच होते. बिबट्या बैलाला मारेल म्हणून बैल सोडवून आणण्याची विनंती केली. स्वरक्षणासाठी एक काठी व कुऱ्हाड सोबत घेतली. बैल सोडताच पुन्हा बिबट्याने झडप घातली. भावाने वार केला, पण तो चुकला.  बिबट्याने झडप घालून बैलाला जखमी केले...ते पाहून बैल वाचविण्यास धावलो. बिबट्याने माझ्यावर झडप घेत नरडीचा घोट घेण्याचा प्रयत्न केला. जीव वाचविण्यासाठी हात पुढे केला. बिबट्याने हातच पकडला...आणि झुंज सुरू झाली. कधी तो वर, मी खाली...कधी मी वर तो खाली.. लहान भाऊ ही झटापट बघतोय, पण त्याला वार करता येत नव्हता ! त्याचा वार चुकला असता तर...माझ्या डोळ्यांसमोर पत्नी व मुलाचा चेहरा...जिवाच्या आकांताने मीही ताकद लावली..आणि भावाने वार केला. तो बिबट्यावर बसताच त्याने पुन्हा संपूर्ण ताकदीनिशी दात माझ्या हातात खोलवर रोवले. माझी जीव वाचविण्यासाठी झडपड सुरू होती.. तोपर्यंत आजूबाजूची आणखी तीन माणसे आली. बिबट्याचा रुद्रावतार पाहून घाबरले. झाडावर चढले. एवढ्यात कुऱ्हाडीचा एक घाव त्या बिबट्याच्या जिव्हारी लागला. त्याची हातावरची पकड सैल झाली. बिबट्याला भावाने काठीने झोडपणे सुरू केले. पण, तो बिबटही मोठा चिवट ! तो गतप्राण झाल्यानंतरच माझा हात सोडविता आला.  भावाने मला गाडीवर बसविले. गावात आलो...वनाधिकाऱ्याला घटनेची माहिती दिली. आम्ही दोघे भाऊ उमरेडच्या शासकीय रुग्णालयात दुचाकीवरून आलो. डॉक्‍टरने तपासून प्रथमोपचार केले. ॲम्बुलन्स बोलावून नागपूरला रवाना केले. नागपूरच्या शासकीय इस्पितळात भरती करण्यात  आले. हातापायावर जखमा आहेत. वनविभागाचे कर्मचारी येऊन बयाण नोंदवून गेले. शासकीय मदत नाहीच. कुणी लोकप्रतिनिधीही नाही भेटायला आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलास झोडापे यांनी स्वतःकडून आर्थिक मदत केली. आणखी मदत लागल्यास मदतीचे आश्वासन दिले. मेलो असतो तर पैसे मिळाले असते! जिता आहो त कुणी वाली नाही... शेतात तूर, गहू, चणा, ज्वारी आहे. जागलीला कुणी जात नाही. एकुलता एक मुलगा आहे. तो माझ्यासोबत आहे. शेत वन्यप्राण्यांसाठी मोकळे झाले आहे. साहेब, संपूर्ण शेत नासले हो..चहूबाजूने जंगलाने वेढलेले शेत आहे, पुढे कसे होईल? लहानपणापासून वन्यप्राणी बघत आलो, पण असा प्रसंग ओढवेल असे वाटले नव्हते.

Web Title: nagpur news leopard attack