अवघे पश्‍चिम नागपूर राममय 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

नागपूर - रामायणातील प्रसंगांवर आधारित चित्ररथ... रस्त्याच्या दुतर्फा झालेली गर्दी... श्रीरामाच्या पालखीचे चौकाचौकांत होणारे स्वागत... एकाचवेळी लाखो भाविकांच्या मुखातून एकाच वेळी होणारा श्रीरामाचा जयघोष... भक्ती, उत्साह आणि समर्पणाचे दर्शन घडवित निघालेल्या शोभायात्रेमुळे अवघे पश्‍चिम नागपूर राममय झाले होते. रामायणातील विविध प्रसंगांवर आधारित सुमारे 35 चित्ररथांमुळे परिसरात अयोध्याच अवतरल्याचा आभास होत होता. 

नागपूर - रामायणातील प्रसंगांवर आधारित चित्ररथ... रस्त्याच्या दुतर्फा झालेली गर्दी... श्रीरामाच्या पालखीचे चौकाचौकांत होणारे स्वागत... एकाचवेळी लाखो भाविकांच्या मुखातून एकाच वेळी होणारा श्रीरामाचा जयघोष... भक्ती, उत्साह आणि समर्पणाचे दर्शन घडवित निघालेल्या शोभायात्रेमुळे अवघे पश्‍चिम नागपूर राममय झाले होते. रामायणातील विविध प्रसंगांवर आधारित सुमारे 35 चित्ररथांमुळे परिसरात अयोध्याच अवतरल्याचा आभास होत होता. 

पश्‍चिम नागपूर नागरिक संघातर्फे रामनवमीच्या पर्वावर रविवारी सायंकाळी रामनगरातील श्रीराम मंदिरातून शोभायात्रा काढण्यात आली. पश्‍चिम नागपुरात शोभायात्रा आयोजनाचे यंदाचे 45 वे वर्ष होते. तमिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते श्रीरामाची पालखी आणि शोभायात्रेतील मुख्य रथाचे पूजन केल्यानंतर शोभायात्रेला प्रारंभ झाला. याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विश्‍व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया, आमदार सुधाकर देशमुख, आमदार परिणय फुके, महापौर नंदा जिचकार, निको समूहाचे बसंतलाला शॉ, ऍड. आनंद परचुरे, मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जोशी प्रामुख्याने उपस्थित होते. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामराज्य स्थापना हेच लक्ष्य असल्याचे सांगितले. विषमतामुक्त आणि समतायुक्त राज्यनिर्मितीचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले. "रामराज्याप्रमाणे आदर्श राज्य स्थापन करण्याचा संकल्प करू या', असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनीही या वेळी उपस्थितांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. 

शोभायात्रेच्या मार्गात सर्वत्र सडा टाकून रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. ऐरवी कोणत्याही प्रसंगी सेल्फी काढण्यात व्यस्त असणारी तरुणाई शोभायात्रेत मात्र सेवेकऱ्याच्या रूपात दिसली. प्रारंभी श्रीरामाची पालखी, त्यापाठोपाठ असणारा मुख्य रथ अपवाणी पायाने असलेले तरुण हाताने ओढून नेत होते. चौकात ठिकठिकाणी पाणी, सरबत, प्रसाद वितरणाचे स्टॉल लावण्यात आले होते. श्रीराम मंदिरातून सुरू झालेली यात्रा बाजीप्रभू चौक, लक्ष्मीभुवन चौक, कॉफी हाउस, झेंडा चौक, लक्ष्मीनारायण मंदिर चौक, शंकरनगर चौक, बजाजनगर, अभ्यंकरनगर चौक, एलएडी कॉलेज चौक, हिल रोडमार्गे बाजीप्रभू चौक मार्गे श्रीराम मंदिर परतल्यानंतर शोभायात्रेची सांगता झाली. 

ज्येष्ठ नागरिक व बालकांसाठी बस 
शोभायात्रेत मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक व बच्चे कंपनीचा सहभाग होता. मात्र, वाटेत दमल्यासारखे झाल्यास त्यांना बसण्यासाठी विशेष बसची व्यवस्था करण्यात आली होती. शोभायात्रेच्या वाटेत ज्येष्ठांसह बच्चेकंपनीने या बसमधून स्वारी करीत आनंदही लुटला. 

लस्सी व चण्याचा आस्वाद 
शोभायात्रेच्या मार्गावर विविध खाद्यपदार्थ वितरणाचे स्टॉल लावण्यात आले होते. त्यातही लस्सी आणि चणे वितरित होणारे स्टॉल अधिक होते. सायंकाळीही उकाडा असल्याने शोभायात्रेत सहभागी सेवेकरी तसेच शोभायात्रा बघण्यासाठी रस्त्यावर उभे असणारे नागरिक घामाघूम झाले होते. त्यातील अनेकांनी विविध स्टॉलवर चण्यासोबतच गारगार लस्सी आणि ताकाचा आस्वाद घेत तृष्णातृप्तीही करून घेतली. 

जलजागृती 
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळातर्फे जलजागृतीपर संदेश देणारा चित्ररथ शोभायात्रेत सहभागी करण्यात आला होता. जलसंवर्धन काळाची गरज या कॅचलाइन असलेल्या या चित्ररथाने लक्ष वेधून घेतले. महामंडळातर्फे मंदिराच्या मुख्य मार्गावर जागृतीपर स्टॉलही लावण्यात आला असून त्याद्वारेही जलसंवर्धनाची गरज अधोरेखित करण्यात आली. 

गोरक्षेचा संदेश अन्‌ योगाचा प्रचार 
रामदेवबाबांच्या शिष्यपरिवारातर्फे सादर योगाचा प्रचार प्रसार करणारा रथ आकर्षणाचे केंद्र ठरला. गायीपासून मिळणाऱ्या घटकांचा औषधी उपयोगाबाबतची माहिती देत गोरक्षणाचे आवाहन करणारा चित्ररथही शोभायात्रेत सहभागी होता. याच रथावर संत दर्शनही घडविण्यात आले. एका संस्थेतर्फे आरोग्यविषयक जनजागृतीपर संदेश दिला जात होता. 

चित्ररथातून उलगडले रामायण 
शोभायात्रेत सहभागी सुमारे 35 आकर्षक चित्ररथ डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले. रामायणातील विविध प्रसंग चित्ररथांद्वारे उलगडण्यात आले. राम, लक्ष्मण, सीता, हनुमानासोबतच स्वामी समर्थ दर्शन, बालाजी दर्शन, गजानन महाराज दर्शन, शंकर पार्वती विवाह, चार वेदांचे वाचन, महर्षी वाल्मीकी, काली रुद्र अवतार, साईबाबा दर्शन आदी चित्ररथांनाही दर्शकांनी पसंतीची पावती दिली. बच्चे कंपनीने महापुरुषांच्या तसेच रामायणातील विविध पात्रांच्या वेशभूषेत सहभागी होत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. संपूर्ण शोभायात्रेदरम्यान बच्चे कंपनीचा उत्साह उल्लेखनीय ठरला. 

35 चित्ररथांनी फेडले डोळ्यांचे पारणे 
पालखीनंतर श्रीरामाचा आकर्षक रथ व सुमारे 35 चित्ररथांचा शोभायात्रेत समावेश होता. बाजीप्रभू देशपांडे चौक, लक्ष्मीभुवन, कॉफी हाउस चौक, झेंडा चौक, शंकरनगर चौक, बजाजनगर चौक, लक्ष्मीनगर चौक, अभ्यंकरनगर चौक, एलएडी महाविद्यालय चौक या मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली. शिवाजीनगर स्केटिंग क्‍लबच्या मुलांनी केलेल्या स्केटिंगच्या प्रदर्शनाने सर्वांची मने जिंकून घेतली. प्रभा देऊस्कर, स्वाती हुद्दार, रवी वाघमारे यांनी संपूर्ण शोभायात्रेचे धावते समालोचन केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur news ramnavi vidarbha