गडकरी म्हणाले, शेतकऱ्यांसाठी विद्यापीठ हेच आमचे "व्हिजन'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

ऍग्रोव्हिजनमध्ये शेतीविषयक मिळणाऱ्या मार्गदर्शनातून शेतकऱ्यांनी प्रेरणा घ्यायला हवी. या सर्वांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे चित्र बदलेल.

नागपूर : "ऍग्रोव्हिजन'ने दहा वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण केली आहेत. शेती विषयावरील संशोधन, प्रशिक्षण आणि विकास हे या काळात ऍग्रोव्हिजनमधून झाले. मात्र, काळ बदलत चालला असल्याने गती वाढविण्याची गरज आहे.

कृषी विषयातील ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला हवे. "ऍग्रोव्हिजन'ने यश प्राप्त करूनसुद्धा अजून मला पूर्ण समाधान मिळाले नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्यावरच मला समाधान मिळेल. आपण सर्वांनी मिळून हा अंधकार दूर करायला हवा. "ऍग्रोव्हिजन'प्रमाणे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण देणारे विद्यापीठ स्थापन व्हायला हवे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

ऍग्रोव्हिजन फाउंडेशनतर्फे आयोजित "ऍग्रोव्हिजन' कृषी प्रदर्शनाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. रेशीमबाग येथील मैदानामध्ये आजपासून सोमवार (ता. 25) पर्यंत या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी माजी कृषी राज्यमंत्री अनिल बोंडे, राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल, राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी आदिवासी मंत्री अशोक उईके, सीसीएफआय आणि यूपीएल समूहाचे अध्यक्ष रज्जू श्रॉफ, नागपूरचे महापौर संदीप जोशी उपस्थित होते. तसेच, ऍग्रोव्हिजन फाउंडेशनच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी, संयोजक गिरीश गांधी, आयोजन सचिव रवी बोरटकर, रमेश मानकर उपस्थित होते. या प्रदर्शनाचे हे 11 वे वर्ष आहे.

गडकरी म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आणि शेतीच्या विकासासाठी विद्यापीठ स्थापन करायचे असल्यास रज्जू श्रॉफ यांच्यासारख्या समाजातील अर्थसंपन्न लोकांनी पुढे यायला हवे. ज्ञानाच्या नदीचा फायदा घेत शेतकऱ्यांनी जीवन कृतार्थ केले पाहिजे. शेतकरी यामध्ये यशस्वी झाल्यास तेच आमचे फळ असेल. शेतकरी हेच आपले भविष्य आहे. तंत्र विज्ञानाची मदत शेतकऱ्यांनी घेतलीच पाहिजे. ऍग्रोव्हिजनमध्ये शेतीविषयक मिळणाऱ्या मार्गदर्शनातून शेतकऱ्यांनी प्रेरणा घ्यायला हवी. या सर्वांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे चित्र बदलेल. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून मुक्त करायचे आहे, असेही ते म्हणाले.

अनिल बोंडे म्हणाले, शेतीमधून नगदी पैसा कसा पिकवता येईल, या दृष्टीने मार्गदर्शन झाले पाहिजे. हे तंत्र विकसित करण्याचे काम ऍग्रोव्हिजनच्या माध्यमातून झाले आहे. शेतीसाठी पायाभूत सुविधा देणे आवश्‍यक आहे. शेतीमध्ये गुंतवणूक वाढवा, हे स्वामिनाथन आयोगानेसुद्धा सांगितले होते. शेतीमध्ये 1 लाख 20 हजार कोटींची गुंतवणूक मागील 5 वर्षामध्ये वाढली. शेतकऱ्यांना सुखी करण्यासाठी कृषी निविष्ठांच्या किमती कमी केल्या पाहिजेत.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ऍग्रोव्हिजनच्या माध्यमातून कृषी क्षेत्रामध्ये आधुनिकीकरण आले आहे. शेतकऱ्यांनी एका एकरामागे 2-3 लाख कमवायला पाहिजे. नवीन बी-बियाणे कसे वापरले पाहिजे, शेती कशी केली पाहिजे, हे या माध्यमातून शिकविण्यात येते. शेतकऱ्यांमध्ये यातून मोठा उत्साह निर्माण होतो आहे. शेतकऱ्यांना फायदा कसा मिळवून देता येईल या दृष्टीने ऍग्रोव्हिजनचे काम सुरू आहे.

पाशा पटेल म्हणाले, गडकरींच्या प्रयत्नांमुळे सोयाबीनला 4 हजार रुपये भाव मिळायला लागला आहे. आयात शुल्क वाढवून घेण्यासाठी गडकरींनी प्रयत्न केले. यामुळे, इतर देशांमधून होणाऱ्या आयातीवर टाच बसली आहे. सडलेल्या फळांचा उपयोग शेतकऱ्यांनी करायला हवा. या फळांपासून वाइन बनविता येते. शेतकऱ्यांनी बनविलेल्या या वाइनचा निर्यात कर कमी केला पाहिजे. जे गरीब माणसाचा विचार करतात तीच माणसे मोठी होतात. कार्यक्रमाचे प्रस्ताविक रवी बोरटकर यांनी, सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी आणि आभार रमेश मानकर यांनी मानले.

विविध विषयांवर कार्यशाळा
ऍग्रो व्हिजनमध्ये यंदा 28 पेक्षा जास्त कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये, ऊस उत्पादन तंत्रज्ञान, फलोत्पादन, सेंद्रिय शेती, पशुधन व्यवस्थापनातील डेअरी, शेळी-मेंढी पालन, कुक्कुटपालन, मत्स्व्यवसाय, हरितगृह तंत्रज्ञान, शेडनेट, कृषी वित्तपुरवठा, कृषी पर्यटन, बांबू उत्पादन अशा विविध विषयांचा समावेश आहे. यावर्षी ग्रामीण भागासाठी उपयुक्त असणारा आणि वृक्ष लागवडीस प्रोत्साहित करणारा "मियावाकी जंगल' हा नवा विषय कार्यशाळेमध्ये आहे. कार्यशाळेत यशोगाथा असणाऱ्या शेतकऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

सरकार कोणाचे बनेल याची चिंता नको
उद्‌घाटन कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर भरभरून बोलले. शेतकऱ्यांविषयी त्यांना असणारी तळमळ यामधून दिसत होती. ते म्हणाले, माध्यमांनी कोणाचे सरकार स्थापन होईल, याची चिंता करायला नको. ज्याचे कोणाचे सरकार येईल, ते येऊ द्या. सरकार कोणाचेही स्थापन झाले तरी काम होणारच आहे. आपल्याला शेतकऱ्यांसाठी चांगले काम करायचे आहे. आपण त्या सरकारकडून काम करुन घेऊ. सर्वात जास्त शेतकरी महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा थांबतील, याचा आपण विचार केला पाहिजे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, nitin gadkari, farmer, agrovision