नागपूरच्या रस्त्यांवर काळोख, नागरिकांच्या जिवाला धोका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

-पथदिवे बंदची दहाही झोन सभापतींची तक्रार
-तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांकाची केली सूचना

नागपूरः शहरातील पथदिवे बंद असल्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. तक्रार करूनही पथदिव्यांची दुरुस्ती केली जात नसल्याची तक्रार आज दहाही झोनच्या सभापतींनी अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापती ऍड. संजय बालपांडे यांच्याकडे केली. झोन सभापतींच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात असल्याची खंत व्यक्त करीत प्रशासनावर ताशेरेही ओढले.
महापालिकेत आज अग्निशमन व विद्युत विशेष समितीची बैठक पार पडली. या वेळी ऍड. संजय बालपांडे यांनी दहाही झोनच्या सभापतींची गाऱ्हाणी ऐकली. या तक्रारीवर गांभीर्याने दखल घेत तातडीने झोन सभापतींच्या सर्व तक्रारींचे निराकरण करण्याचे निर्देश सभापती ऍड. संजय बालपांडे यांनी दिले. पथदिवे बंद असल्याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. या तक्रारींवर प्रशासनाकडून योग्य कार्यवाही होणे आवश्‍यक आहे. यासाठी नागरिकांची सुरक्षा आणि सुविधेच्या दृष्टीने तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांकाची व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या वेळी त्यांनी अग्निशमन सुरक्षा यंत्रणेवरूनही प्रशासनाला धारेवर धरले. शहर विकास आराखड्यात अग्निशमन स्थानाकरिता आरक्षित झिंगाबाई टाकळी, अंबाझरी, चिंचभवन, परसोडी व सोमलवाडा या जागा ताब्यात घेणे, अग्निशमन विभागातील जुने स्थानक लकडगंज, गंजीपेठ व न्यू कॉटन मार्केट पाचपावली विभागातील जुने स्थानक पुनर्बांधकाम करणे, राठोड ले-आउट येथील अग्निशमन स्थानकाकरिता असलेली जागा ताब्यात घेणे, वाठोडा अग्निशमन स्थानकाचे बांधकाम करणे, पथदिव्यांच्या दुरुस्ती व सुस्थितीकरिता नियुक्त एजन्सीची कामगिरी व सर्व प्रभागअंतर्गत बंद असलेल्या विद्युत दिव्यांबाबत चर्चा करण्यात आली.

अग्निशमन यंत्रणेचा अभाव, फौजदारी कारवाईचे निर्देश
शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक मोठ्या इमारती, सदनिका, शाळा, महाविद्यालये, दवाखाने, हॉटेल्स, व्यापारी प्रतिष्ठान आदी ठिकाणी अग्निशमन सुविधा असणे आवश्‍यक आहे. अग्निशमन सुरक्षा व्यवस्था नसलेल्या इमारत मालकांना वेळोवेळी नोटीस देण्यात येते. मात्र, अनेकदा नोटीस देऊनही त्यावर इमारत मालकांकडून कोणतीही कार्यवाही केली जात नाही. यावर ऍड. बालपांडे यांनी महाराष्ट्र आग प्रतिबंधन जीव संरक्षण उपाय योजना अधिनियमानुसार नोटीसकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर फौजदार कारवाई करण्याचे निर्देश ऍड. संजय बालपांडे यांनी दिले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, no light on the streets, endangering the lives of citizens