खड्ड्यांमुळे नागपूरकरांचा जीव धोक्‍यात

छायाचित्र
छायाचित्र

नागपूर ः शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांतून मार्ग काढताना नागपूरकरांना कसरत करावी लागत आहे. खड्ड्यातून मार्ग काढताना सोसाव्या लागणाऱ्या नागरिकांच्या यातनांकडे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनीही पाठ फिरवल्याचे चित्र आहे. क्रीडा, सांस्कृतिक, इनोव्हेशन आदी उत्सवात मग्न असल्याने पदाधिकाऱ्यांचे अधिकाऱ्यांवरील नियंत्रण सुटले आहे. परिणामी शहरातील नागरिकांना रस्त्यातून खड्डे वाचविताना जीव धोक्‍यात घालावा लागत आहे.

शहरात मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्ते तयार होत आहे. पहिल्या टप्प्यातील सिमेंट रस्त्यांची 90 टक्के पूर्ण झाली. मात्र, यातील काही मार्ग वगळण्यात आले. याशिवाय सिमेंट रस्त्यांच्या दुसऱ्या टप्प्यातील रस्त्याचीही कामे अद्याप पूर्ण झाली नाही. सिमेंट रस्ते तयार करण्याचे प्रस्तावित असल्याने महापालिकेने मेडिकल चौक ते क्रीडा चौकापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण आतापर्यंत टाळले. परंतु, हा रस्ता सिमेंट रस्त्यातून वगळण्याचा निर्णय मागील वर्षी घेण्यात आला. सिमेंट रस्ता होणार नसल्याने या रस्त्याचे डांबरीकरण आवश्‍यक आहे. या रस्त्यांवर मोठे खड्डे असून नागरिकांना वाहने काढताना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेकदा दुचाकीधारकाकडून खड्ड्याला बगल देण्यासाठी दुचाकी वळवावी लागते. परिणामी या रस्त्यावर अपघाताची स्थिती निर्माण झाली आहे. मोक्षधाम ते बसस्थानक चौकापर्यंत वर्दळीचा मार्ग असून येथेही खड्ड्यांनी नागरिक बेजार झाले आहेत. या रस्त्यावरून दुचाकीधारक नव्हे तर चारचाकी, जड वाहनधारकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. वंजारीनगर जलकुंभापासून ते टीबी वॉर्डपर्यंतच्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे. जलकुंभाजवळ खोदलेल्या रस्त्याचे पुनर्भरण योग्यरित्या न झाल्याने या खड्ड्यापासून वाहन चालविताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन पुढे जावे लागत आहे. मानस चौक ते मॉरिस कॉलेज टी पॉइंट रस्त्याचीही अशीच स्थिती आहे. पारडी तर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातप्रवण क्षेत्रच झाले आहे. अनेक अपघात झाले. मात्र, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या मनस्तापाशी काहीही देणे-घेणे नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून महापालिकेतील प्रमुख पदाधिकारी क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि इनोव्हेशन आदी कार्यक्रमांत गुंतल्याने अधिकाऱ्याचा निष्काळजीपणा चांगलाच वाढला आहे. गेल्या काही दिवसांत महापौरांनीही रस्त्यांच्या स्थितीबाबत आढावा घेतला नाही. पदाधिकाऱ्यांकडून कानउघडणीच होत नसल्याने अधिकारी चांगल्या रस्त्यांच्या पायाभूत सुविधाही पुरविण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी दहा झोनमधील कार्यकारी अभियंत्यांना खड्ड्यांच्या स्थितीचा अहवाल मागितला होता. परंतु, एकाही कार्यकारी अभियंत्याने हा अहवाल सादर केला नाही. यातूनच अधिकाऱ्यांच्या उदासीन मानसिकतेचीही दर्शन होत आहे.

उड्डाणपुलावरील डांबरही निघाले
रस्त्यावरील खड्ड्यांनीच नव्हे तर उड्डाणपुलावरील खड्ड्यांनीही इंदोरा, कमाल चौकासह उत्तर नागपुरातील नागरिक त्रस्त आहेत. पाचपावली उड्डाणपुलावर मोठे खड्डे आहेत. याशिवाय या पुलावरील डांबरही निघाले. त्यामुळे दोन गर्डरची जोडणी असलेल्या प्रत्येक पन्नास मीटरवर ब्रेकरसारखा उंच भाग तयार झाला. त्यामुळे वाहनातील प्रवाशांना तसेच दुचाकीधारकांना दर पन्नास मीटरवर धक्के सहन करावे लागत आहे.

स्पॉन्डिलायटिस, मणक्‍याचे आजार मोफत
शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यातून वाहने काढताना नागरिकांना बसलेल्या धक्‍क्‍यामुळे स्पॉन्डिलायटिस, मणक्‍याचे आजार, मानेचे आजार होत आहे. एवढेच नव्हे काल, शनिवारी बेसा-बेलतरोडी येथे रस्त्यावरील खड्ड्यात ऍम्बुलन्स फसल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाला. अशी स्थिती शहरातही निर्माण होऊ शकते, एखाद्याचा बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येईल काय? असा संतप्त सवाल आता नागरिक करीत आहेत.

खड्ड्यामुळे कंबरदुखीचा त्रास असलेले रुग्ण वाढले आहेत. खड्डा टाळण्याच्या प्रयत्नात अपघात होऊन फ्रॅक्‍चरचेही रुग्ण मोठ्या प्रमाणात येत आहे. स्पॉन्डिलायटिस, मणक्‍याचे, मानदुखीचे रुग्णांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. स्लिप डिस्कच्या रुग्णांना तसेच हाडे ठिसूळ असलेल्या रुग्णांना या रस्त्यावरून चालणे म्हणजे नरकयातनाच आहे.
- डॉ. आलोक उमरे, अस्थिरोगतज्ज्ञ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com