नागपूर : वृद्धाने केला तरुणीवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

त्याने  तरुणीला जिवे मारण्याची धमकी देऊन बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर बदनामी करण्याची धमकी देऊन वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता.

नागपूर : दुकान मालकाच्या तरुण मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला यशोधरानगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने तेलंगणातून अटक केली. पीडित तरुणीने एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. मात्र, आरोपी फरार झाल्यामुळे पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. श्रीराम रामसजीवन शर्मा (वय 62, रा. वनदेवीनगर चौक, वांजरा ले-आउट) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्रीराम शर्मा हा मूळचा आंध्रपदेशमधील तिरुपती येथील रहिवासी आहे. तो नोव्हेंबर 2016 ला व्यवसाय करण्यासाठी नागपुरात आला होता. त्याने वनदेवी नगरात एका व्यक्‍तीकडून दुकान भाड्याने घेतले होते. त्या दुकानाच्या मागे घरमालक राहत होते. दुकानदार श्रीराम शर्मा हा घरमालकाच्या घरी ये-जा करीत होता. दरम्यान, त्याची ओळख घरमालकाच्या 21 वर्षीय मुलीशी झाली. आरोपी श्रीराम शर्मा घरात कुणीही नसल्याची संधी साधून घरमालकाच्या घरी गेला. त्याने लगेच तरुणीला जिवे मारण्याची धमकी देऊन बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर बदनामी करण्याची धमकी देऊन वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. दरम्यान, ती गर्भवती झाली. तीन महिन्यांची गर्भवती असताना तिचे लग्न ठरले. लग्न झाल्यानंतर तीनच महिन्यांत तिच्या पोटात दुखायला लागल्यामुळे तिला डॉक्‍टरकडे नेण्यात आले. डॉक्‍टरांनी सहा महिन्यांची गर्भवती असल्याचा रिपोर्ट दिला. त्यामुळे तिचे पती आणि नातेवाईक अवाक्‌ झाले. हा प्रकार तरुणीच्या आईवडिलांना सांगण्यात आला. तिची आस्थेने चौकशी केल्यानंतर तिने आरोपी वृद्ध श्रीराम शर्माच्या पापाचा धडा वाचला. माहिती मिळताच श्रीराम शर्मा दुकान सोडून फरार झाला. दरम्यान, ती तरुणी डागा हॉस्पिटलमध्ये प्रसूत झाली. त्या बाळाचे खरे वडील कोण, यासाठी वृद्ध आणि तिच्या पतीचे ब्लड सॅम्पल घ्यायचे असल्याने पोलिस आरोपी वृद्धाचा शोध घेत होते. मात्र, तो परराज्यात पळून गेला होता. 

यशोधराचे ठाणेदार एन. एन. मोहिते यांच्या पथकातील पीएसआय मधुकर काठोके, सहायक पोलिस उपनिरीक्षक विनोद सोलव, लक्ष्मीकांत बारलिंगे, महेश बावणे यांनी तेलंगणा राज्यात सापळा रचून आरोपीला अटक केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, rape