आंबेकरने सीएकडून उकळली 25 लाखांची खंडणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

आंबेकर जेलमध्ये "फिट' झाल्याची माहिती मिळाल्यामुळे आणखी तक्रारदार पोलिसांकडे तक्रार नोंदवीत असल्याची माहिती आहे. 

नागपूर : झोपडपट्टी डॉन संतोष आंबेकर व त्याचा भाचा शैलेश केदारवर आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला. आंबेकरने एका चार्टर्ड अकाउंटंटकडून (सीए) दुकान विकण्याच्या बदल्यात 25 लाखांची खंडणी उकळली. या प्रकरणी आंबेकर व त्याचा भाचा केदारविरुद्ध लकडगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणात तक्रार नोंदविणारे अविनाश जोहरापूरकर पेशाने सीए आहेत. त्यांची दारोडकर चौकात आरणा बिल्डिंग नावाची पाचमजली फ्लॅट स्कीम उभारली आहे. यातील काही फ्लॅट्‌स आणि दुकाने अविनाश यांनी विक्रीसाठी काढली होती. त्यांची आंबेकरशी जुनी ओळख होती. दरम्यान, आंबेकरने अविनाश यांना 25 लाखांच्या खंडणीसाठी धमकावणे सुरू केले. दुकानाची विक्रीही तो करू देत नव्हता. त्यामुळे अविनाश त्रस्त होते. आंबेकरने भाचा शैलेशच्या माध्यमातून अविनाश यांना "गेम' करण्याची धमकीसुद्धा दिली होती. रोख रक्कम किंवा इमारतीमधील एक गाळा देण्याची आंबेकरची मागणी होती. भीतीपोटी 2015 मध्येच अविनाश यांनी शैलेशकडे 25 लाख देण्याची तयारी दर्शविली. त्यापैकी काही रक्‍कम नगद आणि काही धनादेशाद्वारे दिली. काही दिवसांपूर्वी आंबेकरची कारागृहात रवानगी झाल्यामुळे अविनाश यांनी हिंमत दाखवून लकडगंज पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून आंबेकर आणि त्याचा भाचा केदारवर खंडणीचा गुन्हा दाखल केला. 

अकरावा गुन्हा 
आतापर्यंत डॉन संतोष आंबेकरवर दहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आज मंगळवारी लकडगंज पोलिसांनी अकरावा गुन्हा दाखल केला. यामध्ये गुजरातच्या दोन व्यापाऱ्यांना लुटल्याचा, सराफा व्यापाऱ्याला खंडणी मागितल्याचा तसेच एका डॉक्‍टर युवतीवर बलात्कार केल्याचा गुन्हा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, santosh ambekar, ca, 25 lakhs ransom