जंगी सत्कार! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी नागपुरात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी बैठक घेऊन विमानतळासमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला. 

नागपूर : मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे हिवाळी अधिवेशनासाठी प्रथमच नागपूरला येत असल्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसतर्फे त्यांच्या जंगी सत्काराची तयारी केली जात आहे. या संदर्भात आज तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी बैठक घेऊन विमानतळासमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला. 

रविवारी दुपारी एक वाजता मुख्यमंत्री नागपूरला येत आहेत. त्यांचा सत्कारसुद्धा दणक्‍यात करण्याचे नियोजन बैठकीत करण्यात आले. आज रविभवन येथे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सतीश चतुर्वेदी, माजी मंत्री व आमदार अनिल देशमुख, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, माजी खासदार व शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव, माजी मंत्री रमेश बंग, माजी खासदार गेव्ह आवारी या बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर सर्व नेत्यांनी विमानतळाजवळ कुठे सत्कार करायचा याचीही पाहणी केली. अनिल देशमुख, कृपाल तुमाने यांनी मुख्यमंत्र्यांचा पहिलाच दौरा असल्याने स्वागतात कुठलीही कमतरता राहू नये अशी सूचना केली. तसेच सर्व कार्यकर्त्यांनी स्वागताला उपस्थित राहण्याचे आवाहन केले. 

बैठकीला महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते तानाजी वनवे, शब्बीर अहमद विद्रोही, शिवसेना ग्रामीण प्रमुख संदीप इटकेलवार, राजू हरणे, शहर प्रमुख राजू तुमसरे, किशोर कुमेरिया, शेखर सावरबांधे, नितिन तिवारी, मंगेश कडव, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष अनिल अहिरकर, ग्रामीण अध्यक्ष बाबा गुजर, नगरसेवक दुनेश्वर पेठे, नगरसेवक पुरुषोत्तम हजारे, आइशा अन्सारी, एस. क्‍यू. जमा, चंद्रपाल चौकसे, हुकूमचंद आमधरे, नरेंद्र जिचकार, नाना झोडे, बजरंगसिंग परिहार, राजेंद्र भोयर, नीरज चौबे, राजेश जरगर, विजय कदम, दीपक पटेल, शेख अय्याज, किशोर ठाकरे, सुनील बॅनर्जी, विक्रम राठोड, संदीप इटकेलवार, प्रवीण कुंटे, जावेद हबीब, राजू राऊत, रवी परते, श्रीकांत शिवांकर, अलका कांबळे, विशाल खांडेकर, श्रीकांत कैकाडे, किशोर ठाकरे, गुड्डू राहंगडाले, चंद्रहास राऊत यांच्यासह तीनही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, uddhav thakre, cm, winter assembly session