esakal | डावीकडील पहिली खुर्ची कुणाला?
sakal

बोलून बातमी शोधा

डावीकडील पहिली खुर्ची कुणाला?

सभागृह चालविण्यासाठी नियम निश्‍चित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे संसदीय रीतिरिवाज, संकेत, राजशिष्टाचार आहे. यानुसार कामकाज चालते. विधानसभेची रचनाही निश्‍चित आहे.

डावीकडील पहिली खुर्ची कुणाला?

sakal_logo
By
नीलेश डोये

नागपूर : अधिवेशनाच्या वेळी सभागृहात मुख्यमंत्री, मंत्री, विरोधी पक्षनेते आणि सदस्यांच्या बसण्याची एक विशिष्ट रचना आहे. मंत्रिमंडळात फेरबदल झाल्याशिवाय या रचनेत साधारणत: बदल होत नाही. मुंबई आणि नागपूरला होणाऱ्या अधिवेशनाच्या वेळी सारखीच रचना असते. मात्र, यंदा यात बदल दिसणार आहे. मुंबईत पार पडलेल्या विशेष अधिवेशनादरम्यान असलेल्या सभागृहाच्या रचनेपेक्षा नागपुरातील सभागृहाची बैठक रचना वेगळी असणार आहे. 

सभागृह चालविण्यासाठी नियम निश्‍चित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे संसदीय रीतिरिवाज, संकेत, राजशिष्टाचार आहे. यानुसार कामकाज चालते. विधानसभेची रचनाही निश्‍चित आहे. अध्यक्षांच्या उजव्या बाजूस सत्ताधारी पक्ष तर डाव्या बाजूला विरोधी पक्षाचे सदस्य असतात. मुख्यमंत्र्यांच्या बाजूला उपमुख्यमंत्री व नंतर ज्येष्ठ व मंत्रिपदाच्या अनुभवानुसार मंत्र्यांच्या बसण्याची रचना करण्यात आल्याचे समजते. शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीने सरकार स्थापन केले. सदस्यांच्या शपथविधीसोबत बहुमत सिद्ध करण्यासाठी विशेष अधिवेशन मुंबईत घेण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीनंतर मंत्र्यांनी घेतलेल्या क्रमानुसार त्यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. संख्याबळाच्या क्रमानुसार पक्षांच्या सदस्यांना बसण्याचे स्थान देण्यात आले होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूला एकनाथ शिंदेंना स्थान देण्यात आले होते. त्यानंतर क्रमानुसार सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नीतीन राऊत यांना स्थान देण्यात आले होते.

आता खाते वाटप झाले आहे. खाते वाटपाचा क्रमही स्पष्ट करण्यात आला आहे. यानुसार शिंदे यांना नंबर दोन क्रमांकाचा दर्जा देण्यात आला आहे. तर, तिसऱ्या क्रमांकावर छगन भुजबळ, चौथ्या क्रमांकावर बाळासाहेब थोरात, पाचव्यावर सुभाष देसाई, सहाव्या क्रमांकावर जयंत पाटील तर सातव्या क्रमांकावर नीतीन राऊत असतील. यानुसार तीन, चार, पाच आणि सहा क्रमांकाच्या रचनेत बदल होणार असल्याचे समजते. 

विरोधकांकडून पहिली खुर्ची उपाध्यक्षांसाठी राखीव
अध्यक्षांच्या डाव्या बाजूला विरोधी पक्षातील सदस्य असतात. विरोधकांकडून पहिली खुर्ची ही उपाध्यक्षांसाठी राखीव असते, तर त्याच्या बाजूला विरोधी पक्षनेते असतात. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असल्याने त्यांना संधी मिळेल. उपाध्यक्षाची निवड अद्याप झाली नाही. उपाध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे यावर कुणाची वर्णी लागते की खुर्ची रिक्तच राहते, याकडेही लक्ष लागले आहे. 

loading image