esakal | नागपूरमध्ये होणार कर्जमाफीची घोषणा?
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूरमध्ये होणार कर्जमाफीची घोषणा?

नव्या सरकारचे पहिलेच अधिवेशन असल्याने यावेळी विधानभवनावर मोर्चे फारसे धडकण्याची शक्‍यता दिसत नाही. 

नागपूरमध्ये होणार कर्जमाफीची घोषणा?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीने बहुमत सिद्ध केल्याने आता हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू झाली आहे. विधिमंडळाचे सचिवालय मंगळवारीचा नागपूरमध्ये दाखल होत असून बुधवारपासून कामकाजाला सुरुवात करणार आहे. येथे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील कामकाजाच्यादृष्टीने हे पहिलेच अधिवेशन राहणार आहे. 16 डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. यंदाचे अधिवेशन एकच आठवड्याचे घोषित करण्यात आले आहे. तीन पक्षाचे सरकार असल्याने अद्याप मंत्रिमंडळ तसेच खातेवाटपसुद्धा झालेले नाही. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची विरोधीपक्षनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विरोधकांची संख्यासुद्धा मोठी आहे. त्यामुळे यंदाचे अधिवेशन आरोप-प्रत्यारोपाने चांगलेच गाजण्याची शक्‍यता आहे. 

सर्वांचे लक्ष

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याचे त्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्‍वासन दिले आहे. मात्र, दुसरीकडे राज्यावर सहा लाख कोटींचे कर्जसुद्धा आहे. यावर श्‍वेतपत्रिका काढण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शेतकऱ्यांना दिलेले आश्‍वासन कसे पूर्ण करतात याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा भाजपच्या कार्यकाळातील काही प्रकल्पांना विरोध होता. त्यात प्रामुख्याने मुंबई-गुजरात बुलेट ट्रेनचा समावेश आहे.

खडाजंगी होण्याची शक्‍यता

याशिवाय कारशेडसाठी आरे येथील झाडे कापण्यास शिवसेनेने प्रचारादरम्यानच विरोध दर्शविला होता. येथील आंदोलकांवर नोंदवलेले गुन्हे उद्धव ठाकरे यांनी मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.