झेडपी कुणाची, भाजप की महाआघाडीची?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

जागा 58
उमेदवार 270

नागपूर : तब्बल साडेसात वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर जिल्हा परिषदेची निवडणूक होऊ घातली आहे. उद्या, मंगळवारी (ता. 7) याकरिता मतदान घेतले जाणार आहे. निवडणुकीत 58 जागांसाठी 270 उमेदवार आपले भाग्य आजमावत आहेत.

राज्यात सत्ताबदलानंतर भाजपसमोर जिल्हा परिषदेवरील सत्ता कायम ठेवण्याचे आव्हान आहे. तर, महाआघाडीचे दोन मंत्री आणि चार आमदारांची ताकद यातून कळणार आहे.
सुमारे साडेसात वर्षे जिल्हा परिषदेत भाजप आणि शिवसेनेची सत्ता होती. आता युतीत फाटाफूट झाली आहे. त्यामुळे भाजप एकटा पडला आहे. शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढत असली, तरी राज्यातील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महायुतीचे पाठबळ त्यांना लाभले आहे. विशेष म्हणजे, महाआघाडीचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार हे दोन महत्त्वाचे नेते जिल्ह्यात आहेत. याशिवाय उमरेड, रामटेक या दोन मतदारसंघांतही आघाडीचे आमदार आहेत. त्या तुलनेत भाजपकडे दोनच आमदार आहेत.

चिमुकलीला अंधारात बांधून तो झाला मोकळा

माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विधानसभेचे तिकीट नाकारल्याने भाजपकडे एकहाती जिल्ह्याचे नेतृत्व करणारा झंझावाती नेता राहिला नाही. भाजपने सर्व 57 सर्कलमध्ये उमेदवार उभे केले आहेत. कॉंग्रेस व राष्ट्रवादीने महाविकास आघाडी केली; मात्र त्यांना शिवसेनेची साथ मिळाली नसल्याने बहुतांश ठिकाणी तिरंगी लढती होणार आहेत. आघाडी आणि भाजपमध्येही बंडखोरी आहे. तर, शिवसेनेचा गड असलेल्या रामटेक व काटोल मतदारसंघात प्रहारने उमेदवार उभे केल्याने शिवसेनाही अडचणीत येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

1828 मतदान केंद्रे
जिल्ह्यातील 1 हजार 828 केंद्रांवर सकाळी 7.30 वाजतापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान करता येणार आहे. यासाठी निवडणूक विभागाने जय्यत तयारी केली आहे. राखीव बॅलेट मशीनसह भरारी व फिरते पथके निवडणुकीच्या कामकाजावर देखरेख करणार आहेत. पोलिस विभागानेही तगडा बंदोबस्त लावला असून, अतिरिक्त कुमुक मागविण्यात आली आहे. पोलिसांचेही फिरते पथक बंदोबस्तावर नजर ठेवणार आहे.

येथे होतील लक्षवेधी लढती
अनुसूचित जाती महिलासाठी राखीव असलेल्या बेलोना, टेकाडी, बेसा, सोनेगाव-निपानी यांसह नांद सर्कलमधून विजयी उमेदवाराच्या गळ्यात जिल्हा परिषद अध्यक्षपदाची माळ पडणार असल्याने येथील लढती महत्त्वाच्या ठरणार आहेत. नांद सर्कलमध्ये बंडखोरी झाल्याने सर्वाधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सोनेगाव-निपानी व बेसा सर्कलमध्ये कॉंग्रेस-भाजपमध्ये थेट लढत आहे. बेलोना व टेकाडीत बंडखोरांचे आव्हान आहे.

झेडपीतील मातब्बरांची परीक्षा
जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते कॉंग्रेसचे मनोहर कुंभारे, माजी उपाध्यक्ष तापेश्‍वर वैद्य, माजी उपाध्यक्ष अपक्ष शरद डोणेकर यांच्यासह माजी सभापती चंद्रशेखर चिखले, वंदना पाल, पुष्पा वाघाडे, कॉंग्रेसचे नाना कंभाले, शांता कुमरे, भाजपचे अनिल निधान, संदीप सरोदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उज्ज्वला बोढारे, सूचिता ठाकरे, शिवसेनेचे देवेंद्र गोडबोले, नंदा लोहबरे यांच्या अस्तित्वासाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे.

आमदारपुत्रांच्या भवितव्याची लढत
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील हे काटोल तालुक्‍यातील मेटपांजरा सर्कलमधून लढत आहेत. त्यांच्यासमोर भाजपचे प्रवीण अडकिणे, शिवसेनेचे माधव अनवाणे, दिलीप डंभारे व सुधाकर बागडे यांचे आव्हान आहे. मेटपांजरा पंचायत समितीत अपक्ष निशिकांत नागमोते यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. माजी मंत्री राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रमेशचंद्र बंग यांचे पुत्र दिनेश हे रायपूर सर्कलमधून लढत आहेत. त्यांच्यासमोर कॉंग्रेसचे माजी सत्तापक्षनेते बाबा आष्टनकर, शिवसेनेचे जगदीश कन्हेर, भाजपचे विकास दाभेकर यांचे आव्हान आहे.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur : zp and panchayat samiti election