सेना, राष्ट्रवादीला मिळणार "बूस्ट'; सत्ता बदलाचा परिणाम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

यावेळी सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याचा अंदाज आहे. मागील विधानसभेच्या तुलनेत भाजपची ताकद कमी झाल्याचे चित्र आहे. 

नागपूर : राज्यात शिवसेनेसह कॉंग्रेस व राष्ट्रवादीची महाविकास आघाडी सत्तेवर येताच जिल्ह्यातील राजकारणालाही कलाटणी मिळण्याची शक्‍यता आहे. या नव्या सत्ता समीकरणाचा जिल्हा परिषदेच्या राजकारणावरही परिणाम होणार आहे. यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीला "बूस्ट' मिळणार असल्याचे बोलल्या जात आहे. 

जिल्हा परिषदेच्या निवडणुका जानेवारी महिन्यात होणार आहे. नवे सरकार स्थापन झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असणार आहे. सध्या जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता होती. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. सत्तेच्या नव्या समीकरणाचा या निवडणुकीवरही परिणाम होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. जिल्हा परिषदेमध्ये सेना आणि राष्ट्रवादीने दहाचा आकडा आतापर्यंत पार केला नाही. आता मात्र, सेनेकडे मुख्यमंत्रिपद आहे. तर राष्ट्रवादी व कॉंग्रेसलाही महत्त्वाची पदे मिळणार असल्याची चर्चा आहे. 

2012 मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक झाली होती. त्यावेळी भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. भाजपच्या वाट्याला 22 जागा आल्या होत्या. तर सेनेच्या 8 जागा निवडणूक आल्या होत्या. तर कॉंग्रेसला 19 आणि राष्ट्रवादीला 7 जागा मिळाल्या होत्या. एक-एक जागा बसप, गोंगपा आणि आरपीआयला मिळाली होती. मागील वेळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी व भाजप-सेना स्वतंत्र निवडणुका लढल्या होत्या. यावेळी सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याचा अंदाज आहे. मागील विधानसभेच्या तुलनेत भाजपची ताकद कमी झाल्याचे चित्र आहे. 

निवडणूक भाजपला अवघड जाणार 
विधानसभा निवडणुकीत भाजपला तीन जागा गमवाव्या लागल्या. नागपूर ग्रामीण पंचायत समितीमध्ये भाजपला "लिड' असल्याचे सांगण्यात येते. काही पंचायत समितीत कॉंग्रेसला आघाडी आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजपला अवघड जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. निवडणुकीतील घडामोडीमुळे पक्षातही मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. याचाही परिणाम निवडणुकीवर होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे एकूणच जिल्हा परिषदेच्या राजकीय चित्रावर परिणाम होणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, zp election, congress, ncp, shivsena