दीक्षाभूमीच्या विकासकामांसाठी १९० कोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dikshabhumi

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली त्या पवित्र दीक्षाभूमीच्या विकासकामांसाठी १९० कोटी रुपयांच्या निधी प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली.

Nagpur Dikshabhumi : दीक्षाभूमीच्या विकासकामांसाठी १९० कोटी

नागपूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली त्या पवित्र दीक्षाभूमीच्या विकासकामांसाठी १९० कोटी रुपयांच्या निधी प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली असल्याची माहिती नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र) व नागपूर महानगर विकास प्राधिकरण(एनएमआरडीए) ने दिली. राज्यशासनाच्या उच्चस्तरीय समितीने याबाबत १० जानेवारी रोजी बैठक घेत हा निर्णय घेतला. या बैठकीमध्ये न्यायालयाने या दोन्ही विभागांना यावर तीन आठवड्यात शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले.

अ‍ॅड. शैलेश नारनवरे यांनी यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लाखो अनुयायांसह नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्यामुळे दीक्षाभूमीचे नाव संपूर्ण जगभरात पोहोचले आहे. दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देश-विदेशातून लाखो अनुयायी दीक्षाभूमीवर येतात. मात्र, अनुयायांची होणारी गर्दी व त्या तुलनेत प्राथमिक सुविधांचा अभाव लक्षात घेता लोकांची चांगलीच गैरसोय होते.

विशेष म्हणजे, दीक्षाभूमीला ‘अ’ पर्यटनाचा दर्जा आहे. त्यामुळे शेगाव देवस्थानाच्या धर्तीवर विकास आराखडा तयार करून धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, आरोग्य सुविधा व पर्यटनाच्या दृष्टिकोनातून दीक्षाभूमीचा सर्वांगीण विकास करण्यात यावा अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

दीक्षाभूमीचा दोन टप्प्यात विकास करण्यात येणार असून यासाठी राज्य सरकारकडे विकासनिधीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार १९० कोटी रुपयांच्या निधी प्रस्तावाला मंजुरी प्रदान करण्यात आली असल्याचे राज्य सरकारने न्यायालयाला सांगितले. याचिकाकर्ते अ‍ॅड. शैलेश नारनवरे यांनी स्वतः बाजू मांडली.