esakal | कोरोनाने मृत्यू झालाय? मग पंतप्रधान विमा योजनेतून 'असे' मिळू शकतात दोन लाख

बोलून बातमी शोधा

विमा
कोरोनाने मृत्यू झाल्यास पंतप्रधान विमा योजनेतून मिळू शकतील दोन लाख
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पंतप्रधान जीवन ज्योती वीमा (pradhan mantri jeevan jyoti bima yojana) काढलेल्या व्यक्तीचा जर दुर्दैवाने कोरोना (corona) आजाराने मृत्यू झाला असल्यास त्याच्या वारसांना दोन लाख रुपये रक्कम मिळू शकते. कोरोना महामारीमुळे (coronavirus pandemic) आर्थिक संकटात आलेल्या कुटुंबाला यामुळे दिलासा मिळू शकतो. (2 lakh can get from pradhan mantri jeevan jyoti bima yojana in case of corona patient death)

पंतप्रधान जीवन ज्योती वीमा काढलेल्या व्यक्तीच्या खात्यातून दरवर्षी ३३० रुपये कपात केली जाते. ही योजना एक प्रकारे टर्म विमाच आहे. अनेकांनी हा विमा काढलेला असतो पण विम्याची रक्कम कमी असल्याने त्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. विमाधारकाचा जर अकाली मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये आणि अपंगत्व आल्यास एक लाख रुपये मिळण्याची तरतूद या योजनेत आहे. ज्यांनी हा विमा काढला आहे त्यांना विमा योजनेची कुठलेही कागदपत्रे दिली जात नाहीत. फक्त खाते पुस्तकात त्याची नोंद केली जाते. अनेक लाभार्थ्यांच्या वारसांना याची माहिती नसते. परिणामी माहितीच्या अभावी कित्येकांना याचा लाभच मिळत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपले खाते पुस्तक अद्ययावत करून विमा कपात केलेल्या नोंदींची माहिती घ्यावी. विमाधारकाचा कोरोनाने मृत्यू झाल्यास संबंधित बॅंकेकडे विचारणा करून योजनेचा लाभ घेणे शक्य आहे.

नागपूर व विदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथं क्लिक करा

पासबुक अद्ययावत करा - कोरोना महामारी येण्याच्या आधीच ही योजना सुरू आहे. त्यामुळे, योजनेच्या नियमावलीमध्ये कोरोनासाठी लागू आहे अथवा नाही याबाबत कुठलाही उल्लेख नाही. या दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या खातेदारांनी डिसेंबर किंवा जून अखेरीस आपल्या बँक खात्याचे पासबुक अद्ययावत करावे. या महिन्यात विमा योजनेची रक्कम वजा झाल्याची नोंद होते. याबाबत आपले वारसदार किंवा कुटुंबीयांना माहिती देऊन ठेवल्यास प्रत्येक लाभार्थी कठीण प्रसंगी याचा लाभ घेऊ शकेल.
-सुरेश बोभाटे, अध्यक्ष, इंस्टंट महाराष्ट्र बँक एंप्लॉइ युनियन.

फक्त १२ रुपयांमध्ये अपघात विमा -

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत बँक खात्यातून ज्यांचे १२ रुपये दरवर्षी वजा झाले आहेत अशा खातेदाराचा अपघाताने मृत्यू झाला असल्यास त्यांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये लाभ मिळतो. अनेकांना याची माहिती नसते. तसेच, पैसे कपात झाल्याची पावतीही मिळत नाही. त्यामुळे, कुटुंबीयांनी थेट बँकेत पासबुकसह जाऊन याबाबत विचारणा करावी आणि लाभ घ्यावा, असे आवाहन केले जात आहे. या योजनेचा लाभ फक्त अल्पसंख्यांक नागरिकांना मिळतो.

(2 lakh can get from pradhan mantri jeevan jyoti bima yojana in case of corona patient death)