esakal | कोरोनानं घेरलं, पण इच्छाशक्तीनं तारलं; ७५ वर्षांच्या आजीची कोरोनावर मात
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनानं घेरलं, पण इच्छाशक्तीनं तारलं; ७५ वर्षांच्या आजीची कोरोनावर मात

कोरोनानं घेरलं, पण इच्छाशक्तीनं तारलं; ७५ वर्षांच्या आजीची कोरोनावर मात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा(coronavirus) शहरी भागांसोबतच गावखेड्यांमधील नागरिकांनाही जबर फटका बसतो आहे. मात्र योग्य उपचार आणि प्रबळ इच्छाशक्ती असणारे रुग्ण यातून सहज बाहेर पडत असल्याचे सुखद चित्र सध्या जागोजागी पाहायला मिळत आहेत. नांदीखेडा (ता. कळमेश्वर) येथील कुंभारे परिवार त्याचे उत्तम उदाहरण आहे. या परिवारातील ७५ वर्षीय आजी व त्यांच्या दोन नातवांनी इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनाला हरवून या आजाराला विनाकारण घाबरणाऱ्या संक्रमितांमध्ये नवी आशा व उमेद जागविली आहे. (75 years old woman defeat corona virus with positive thinking)

हेही वाचा: आयकर अधिकाऱ्याचा महिला डॉक्टरवर बलात्कार; व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी

कुसुम कुंभारे या कोरोनामुक्त झालेल्या आजी, तर प्रीतम व मंदार हे नातू आहेत. दुसऱ्या लाटेचा जिल्ह्यात सर्वत्र कहर सुरू असताना एकेदिवशी कुंभारे परिवारावरही कोरोनाने अनपेक्षित हल्ला चढविला. एकाचवेळी कुटुंबातील तिघांना कोरोनाची लागण झाली. सुरवातीला नातवांना कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर आजी कचाट्यात सापडली. मात्र कुंभारे परिवाराने कोरोनाचे अजिबात टेन्शन घेतले नाही. सर्वप्रथम तिघांनीही स्वतःला घरीच 'आयसोलेट' करून उपचार सुरू केले. रोगप्रतिकारकशक्ती चांगली असल्यामुळे २४ वर्षीय प्रीतम व २२ वर्षीय मंदार लवकर रिकव्हर झाले. पंधरा दिवसांपूर्वी लस घेतल्यामुळे आजीही गंभीर झाली नाही. विलगीकरण काळात तिघेही नॉर्मल आयुष्य जगून अवघ्या दोन आठवड्यात कोरोनामुक्त झाले.

नियमित उपचार, निरोगी शरीर व प्रबळ इच्छाशक्तीमुळेच या जीवघेण्या आजारातून तिघेही लवकर बाहेर पडल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असलेले कुसुम यांचे पुत्र मनोहर कुंभारे यांनी सांगितले. ते म्हणाले, कोरोना हा गंभीर आजार असला तरी त्यामुळे घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. सकारात्मक राहून डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याने त्यावर सहज मात करता येऊ शकते. 'पॉझिटिव्ह' विचार ठेवून माझी आई या दिवसांमध्ये वागली. कदाचित त्यामुळेच आई व दोन्ही मुलांना कोरोनाच्या जीवघेण्या संकटातून लवकर बाहेर पडता आले. नऊ जणांचा संयुक्त परिवार असलेल्या आमच्या कुटुंबासाठी हा फार मोठा आनंदाचा व दिलासा देणारा क्षण होता.

माझी आई तब्येतीबद्दल नेहमीच जागरूक असते. त्यामुळेच वयाच्या पंच्याहत्तरीतही ती ठणठणीत आहे. तिला कोरोनाची लागण झाली. मात्र ती एका क्षणासाठीही घाबरली नाही. जिद्द व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर तिने या आजारावर सहज मात केली. लस घेतल्याचाही तिला फायदा झाला.
-मनोहर कुंभारे, कुसुम यांचा मुलगा

(75 years old woman defeat corona virus with positive thinking)