
ॲसिड हल्ला प्रकरण; आरोपी पतीला तीन दिवसांची पोलिस कोठडी
नागपूर : पत्नीवर ॲसिडसदृश्य द्रव फेकून जखमी करणाऱ्या पतीची जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास रामेश्वरीतील काशीनगर परिसरात पत्नीवर ॲसिडसदृश्य द्रव फेकून तो पसार झाला होता. यानंतर त्याला लगेच अजनी पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
सुरेश झेंगटे (४२) प्लम्बरचे काम करायचा. गेल्या तीन वर्षांपासून त्याचा पत्नीशी वाद सुरू होता. या वादातून तो दररोज दारू पिऊन येत पत्नीला मारायचा. त्यामुळे दोघे महिनाभरापूर्वी वेगळे झाले होते. शनिवारी सकाळच्या सुमारास ती सायकलने पोळ्या करण्याच्या कामासाठी जात असताना सुरेशने काशीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकीवरून मंजुळा प्लाझा बिल्डिंगच्या बाजूला पत्नीच्या चेहऱ्यावर ग्लास मध्ये भरून आणलेले ॲसिडसदृश्य द्रव्य फेकून फरार झाला.
हेही वाचा: सोशल फॉर अॅक्शन: क्राउड फंडिंगच्या माध्यमातून ६ स्वयंसेवी संस्थांना मदत
या प्रकाराने परिसरात खळबळ माजली. लगेच त्यांना आजूबाजूच्या नागरिकांनी उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल केले. दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवित, सुरेशला अटक केली. आज त्याला सकाळी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यासमोर सादर करण्यात आले. यावेळी त्यांनी त्याची तीन दिवसाच्या पोलिस कोठडीत रवानगी केली.
अहवाल येणार आठवड्याभरात
पतीने पत्नीच्या चेहऱ्यावर फेकलेले ॲसिड नेमके कोणते आहे, हे तपासण्यासाठी ते न्याय वैद्यक सहाय्य प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली होती. दरम्यान सुरेश प्लंबरचे काम करीत असल्याने टाकी स्वच्छ करण्यासाठी जे द्रव्य वापरण्यात येते, त्याचाच उपयोग करण्यात आला असल्याचा कयास पोलिसांनी व्यक्त केला होता. मात्र, वापरण्यात आलेले द्रव्य प्रयोगशाळेत तपासण्यासाठी वेळच लागणार असून त्याचा अहवाल आठवड्याभरात येणार असल्याचे समजते.
Web Title: Acid Attack In Nagpur Criminal Police Custody
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..