
प्रशासनाची धुरा महिला अधिकाऱ्यांच्या हाती
नागपूर : ‘चूल आणि मुल’ अशी संकल्पना केव्हाच मागे पडली आहे. आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत कामगिरी करीत आहेत. प्रशासन हाताळण्यात त्या तरबेज असून नागपूर विभागात विभागीय आयुक्त ते तहसीलदार पदांपर्यंत महिला अधिकारी कार्यरत आहेत. प्रशासनाचा कारभार महिलांच्या हाती येण्याचा योग नागपूर विभागात प्रथमच जुळून आला आहे.
नागपूरच्या विभागीय आयुक्तपदावर प्राजक्ता लवंगारे-वर्मा आहेत. पहिल्यांदाच विभागीय आयुक्त पदावर महिला अधिकारी कार्यरत आहेत. अंत्यत प्रामाणिक आणि पारदर्शकपणे कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. तसेच जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी पदांवरही महिला अधिकारी आहेत. जिल्हाधिकारी आर. विमला यांनी काही नवीन उपक्रम राबवीत कार्यालयाचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्याचा सोबत मिळाली आहे, विजया बनकर यांची. बनकर या निवासी उपजिल्हाधिकारी आहेत. या पदावरही पहिल्यांदाच महिला अधिकारी आल्यात.
प्रशासनाची धुरा महिला अधिकाऱ्यांच्या हाती
नागपूर ग्रामीणच्या उपविभागीय अधिकारी म्हणून इंदिरा चौधरी कार्यरत आहेत. त्यांच्या सोबतीला तहसीलदार (हिंगणा तालुका) प्रियदर्शिनी बोरकर आहेत. महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात जिल्हा प्रगतीच्या दिशेने जात आहे. पदावर महिला असल्याने नागरिकांचे प्रश्न जिव्हाळ्याने समजून निकाली काढण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे.
चार उपजिल्हाधिकारी महिला जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागात चार महिला उपजिल्हाधिकारी कार्यरत आहे. यात सुजाता गंधे, मीनल कळसकर, माधुरी तिखे आणि पूजा पाटील हे अधिकारी आहेत.
रिअल लाइफ’ मध्ये हिरो
पद्मविभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते वडील अदूर गोपालकृष्णन हे प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक असताना ‘रील लाईफ नव्हे तर रिअल लाइफ’ मध्ये हिरो ठरलेल्या अस्वती दोरजे शहर सहपोलिस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.
वाघ संवर्धनात महिला
वाघ म्हटले की, सर्वांचीच भांबरी उडते, त्याचे संरक्षण म्हणजे आव्हानच. मात्र, पेंच व्याघ्र प्रकल्पाची धुरा वनसंरक्षक श्रीलक्ष्मी अनाबथुला यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांनी यापूर्वी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे उपवनसंरक्षक म्हणून काम केले आहे. त्यानंतर अहमदाबाद येथे उपवनसंरक्षक म्हणून काम केल्यानंतर आता व्याघ्र राजधानी असलेल्या नागपूर येथील पेंच व्याघ्र प्रकल्पात रुजू झाल्या आहेत.b
कामगार रुग्णालयात महिला व्यवस्थापन
सोमवारीपेठेतील राज्य कामगार रुग्णालयात मागील पाच वर्षांपासून कामगार रुग्णालयाची धुरा महिला सांभाळत आहेत. वैद्यकीय अधीक्षक डॉ. मीना देशमुख आहेत. प्रशासकीय अधिकारी डॉ. जी. एस. धवड तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.ए. चौधरी कार्यरत आहेत. अलीकडेच राज्य कामगार विमा योजना सोसायटी स्थापन झाल्यानंतर कामगार रुग्णांना योग्य सुविधा देण्यात येत आहेत.
अजनी रेल्वेस्थानकाचे व्यवस्थापन महिलांच्या हाती
उपराजधानीतील अजनी रेल्वे स्थानकावर मागील चार वर्षांपासून कायमस्वरूपी महिला राज आहे. अजनी रेल्वे व्यवस्थापक माधवी चौधरी यांच्या नेतृत्वात रेल्वे स्टेशनवर जवळपास २७ महिला कर्मचारी आहेत. यात बुकिंग क्लार्क, टीसी, बुकिंग अॅडव्हायझर, रेल्वे पोलिस कर्मचारी, पॉईंट पर्सन, उद्घोषक यांच्यापासून तर सफाई कामगार महिलांचा समावेश आहे.
मेयोत महिला राज
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) महिला राज आहे. अधिष्ठाता पदावर डॉ. भावना सोनोने कार्यरत आहेत. तर वैद्यकीय उपअधीक्षक पदावर डॉ. लीना धांडे आहेत. याशिवाय कोरोनाच्या पहिल्या रुग्णाला तपासण्यापासून तर कोरोना रुग्णांवर योग्य उपचारातून नियोजनाचे काम डॉ. तिलोत्तमा पराते यांच्यासह महिलांनीच उत्कृष्टरित्या सांभाळले आहे.
Web Title: Administration The Hands Women Officers International Women Day Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..