
मूल : तालुक्यातील मानव-वन्यजीव संघर्षावर मात करण्याच्या दृष्टीने आता कृत्रिम बुद्धिमत्ता काम करणार आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता अर्थात एआय सिस्टीम वनविभाग आणि गावकऱ्यांना सतर्क करणार आहे. याबाबत मूल तालुक्यातील बफर झोन क्षेत्रात आरटीपी एआय सिस्टीमचे चोवीस कॅमेरे लागले आहेत. याचा वनविभाग आणि गावकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.
तालुक्यातील कोअर, बफर आणि नॉन बफर क्षेत्रात वन्यप्राण्यांची संख्या अधिक आहे. मानव-वन्यजीव संघर्ष हा येथील पाचवीलाच पुजलेला विषय. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या एआय सिस्टीमचा पर्याय वनविभागाने शोधून काढला. हा कॅमेरा वन्यप्राण्यांची छबी टिपून घेणार आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना अलॉर्मद्वारे अलर्ट करणार आहे. गावाजवळच्या शेतशिवार परिसरात आणि गावाजवळ हे कॅमेरे लावण्यात आले आहेत.
काटवन, पडझरी, भादुर्णी आणि मारोडा येथे प्रत्येकी सहा असे एकूण २४ कॅमेऱ्यांची सोय करण्यात आली आहे. वाघ, बिबट तसेच अस्वल या हिंस्त्र वन्यप्राण्यांची भ्रमंती या कॅमेऱ्यात टिपली जाणार आहे.
त्यासाठी वनविभागातील अधिकारी वर्ग आणि कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनी जोडण्यात आले आहे. छबी टिपल्यानंतर वरिष्ठ वनाधिकारी, तालुक्यातील वनपरिक्षेत्राधिकारी, वनकर्मचारी तसेच पीआरटी टीम यांच्या भ्रमणध्वनीमध्ये लगेच अलॉर्म वाजून त्या वन्यप्राण्यांची छबी त्यात येणार आहे.
त्यामुळे वनाधिकारी आणि कर्मचारी सतर्क होतील आणि ज्या परिसरात, गावाजवळ अथवा शेतशिवारात धोका आहे, त्या परिसरात, गावात जाऊन गावकरी, शेतकरी, शेतमजूर, गुराख्यांना धोक्याची सूचना देतील. यामुळे बराच फायदा होत असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
वनविभागाच्या निधीतून कॅमेऱ्यांची खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये एक कॅमेरा, एक व्हुटर, एक बॅटरी, सोलर पॅनल आणि लाईटची असा एक संच बसविण्यात आला आहे.चोवीस तास ही सेवा कार्यरत राहणार आहे. जिल्ह्यात प्रथमता ही सेवा मोहुर्ली येथील सीतारामपेठ येथे कार्यरत करण्यात आली. त्यानंतर हिंस्र वन्यप्राण्यांचा धोका जास्त असलेल्या भागात बसविण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.