esakal | ओरिसावर जरब बसविणारे खडी धामणीचे सरदार भवानीपंत काळू
sakal

बोलून बातमी शोधा

ओरिसावर जरब बसविणारे खडी धामणीचे सरदार भवानीपंत काळू

ओरिसावर जरब बसविणारे खडी धामणीचे सरदार भवानीपंत काळू

sakal_logo
By
अनिल यादव

नागपूर : विदर्भात जी काही मोजकीच राजघराणी आहेत त्यामध्ये सिंदखेडचे जाधव आणि नागपूरचे भोसले अशी दोनच आहेत. दोन्ही घराणी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याशी संबंधित आहेत. सिंदखेडच्या जाधव घराण्यासोबत तर रक्ताचे नाते आहे. तसेच पेशवाईच्या काळात नागपूरकर भोसले घराण्याची मुहूर्तपेढ रोवल्या गेली.

स्वराज्य स्थापनेत जाधव घराण्यातील पुरूष सहभागी झाल्याचा इतिहास नसला तरी धनाजी जाधवाने मात्र, दिल्लीच्या मोघल बादशहा औरंगजेबाला जेरीस आणले होते. धनाजींचा पूत्र चंद्रसेन जाधव यानेही स्वराज्याची सेवा केली असली तरी कोल्हापूर आणि सातारा या छत्रपतींच्या दोन शाखांमध्ये झालेल्या संघर्षामुळे त्यांच्या शक्तीचा पाहिजे तेवढा उपयोग पेशवाईला करून घेता आला नाही. हाच चंद्रसेन जाधव पुढे मोघलांना जाऊन मिळाला होता.

नागपूरकर भोसले हे विदर्भातील दुसरे पराक्रमी मराठा घराणे होय. मुधोजी आणि रूपाजी भोसले हे बंधू शिवाजी महाराजांच्या लष्करात होते. नागपूरकर भोसले घराण्याचा मुधोजी हा मुळ पुरूष मानला जातो. मुधोजींना सात मुले होती तर रूपाजी निपुत्रिक होते. परसोजी भोसले हा मुधोजींचा पूत्र महत्वाकांक्षी होता. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गादीसाठी झालेल्या सत्तासंघर्षात परसोजी भोसलेने संभाजी महाराजांच्या विरोधात भूमिका घेतली होती.

परंतु, संभाजी महाराजांचा विजय झाल्यानंतर परसोजी खानदेशात पळाला.त्यानंतर राजाराज गादीवर येईपर्यंत रूपाजी आणि परसोजी यांचा स्वराज्याशी फारसा संबंध नव्हता. राजाराम छत्रपती झाल्यानंतर रूपाजी आणि परसोजी स्वराज्याच्या सेवेत आले. याच शाखेतील रघूजी भोसले हा सर्वात शूर आणि पराक्रमी सरदार होता. त्यांच्याच वंशजांनी पुढे नागपूरकर भोसले घराण्याला वैभव प्राप्त करून दिले.

नागपूर येथील भोसल्यांच्या दरबारी पुणे, खान्देश आणि वऱ्हाडातील अनेक लहान-थोर सरदार सेवेत होते. काही राजकारणी तर काहींनी तलवारबाजीत नाव कमावले. यापैकी सरदार भवानीपंत काळू यांनी मात्र, राजकारण आणि मैदान अशा दोन्ही पातळीवर राजघराण्याची सेवा केली. भवानीपंत यांचा जन्म खडी धामणी (ता.कारंजा लाड, जि. वाशिम) येथे १८१७ च्या सुमारास झाला.

काळू हे त्यांच्या वडिलांचे नाव. पंतांचा नागपूरकर भोसल्याशी संबंध त्यांचे भाचे वाशिमचे राजारामपंत वाळके यांच्यामुळे आला. वाळके हे पहिल्या रघुजी भोसल्यांचे पुत्र साबाजी यांचे दिवाण होते. विशेष म्हणजे त्याकाळी साबाजी भोसले यांचे वास्तव्य वऱ्हाडातील दारव्हा येथे होते. साबाजी यांच्या कानी भवानीपंत आणि त्यांचे बंधू गणेशपंत यांच्या पराक्रमाच्या खबरा येत असत. पुढे भवानीपंतच साबाजी भोसल्यांचा कारभार पाहू लागले. पंत हे युध्दातही निष्णात होते.

भोसले बंधूत वाद आणि पेशव्यांचा वाशिम दौरा

साबाजी आणि त्यांचे मोठे बंधू जानोजी भोसले यांच्यात काही कारणांमुळे वाद निर्माण झाला. प्रकरण पेशवे माधवराव यांच्यापर्यंत गेले. ही घटना पानिपतच्या युध्दानंतर तीन वर्षांनी म्हणजे १७६४ मध्ये घडली. यावेळी भवानीपंत यांनी मुत्सदेगिरीने साबाजी यांचे मन वळवून दोन्ही बंधूमधील गृहकलह टाळला. याचदरम्यान पेशवे माधवराव वाशिम येथे आले.

दोन्ही बंधूंत समेट झाला.परिणामी जानोजी भोसले यांचाही पंतांवर विश्वास बसला. एवढेच नव्हे तर साबाजी यांच्याकडून पंतांना स्वताकडे मागून घेतले. यावेळी ओरिसा आणि बंगाल प्रांतात गैरव्यवस्था निर्माण झाली होती. शिवभट साठे हा या प्रांताचा सुभेदार होता. बंगालच्या चौथाईच्या वसुलीत गोंधळ असल्याने जानोजी भोसल्यांनी साठ्याकडून सुभेदारी काढून घेतली. परंतु, याचा शिवभटावर काहीच परिणाम झाला नाही.

त्यांच्या बंडाळ्या आणखीनच वाढल्या. बंडखोर सुभेदाराला पायबंद घालण्यासाठी जानोजी यांनी त्यांचा पुतण्या चिमणाबापू यांना सुभेदार नेमले आणि कारभारी म्हणून त्याच्यासोबत भवानीपंतांना सैन्यासह ओरिसाला पाठविले. सर्वप्रथम साठ्यांवर हल्ला केला. त्यामुळे तो कोलकाता येथे इंग्रजांच्या आश्रयास गेला. पुढे पंतांनी हरिहरपूर आणि निलगिरी येथील जमिनदारांशी लढाया करीत त्यांना शरण येण्यास भाग पाडले. पंतांमुळे ओरिसा प्रांताचा कारभार सुरळीत सुरू झाला.

पाचगावच्या लढाईत जखमी

जानोजी भोसले १७७२ मध्ये मरण पावले. गादीसाठी पुन्हा एकदा मुधोजी आणि साबाजी भोसले या बंधुमध्ये १७७५ मध्ये पाचगाव येथे लढाई झाली. सेनापती म्हणून भवानीपंत साबाजीकडून लढले. लढाईत पंतांना २१ जखमा झाल्या. लढाईत गोळी लागल्याने साबाजी ठार झाले. मात्र, मुधोजी यांनी पंतांकडे सेनापतीपद कायम ठेवतानाच त्यांची बक्षी म्हणूनही नियुक्ती केली.

पुढे वयाच्या ८३ व्या वर्षांपर्यंत पंतांनी नागपूर संस्थानाची सेवा केली. त्यांचा मृत्यू कधी झाला याचा पुरावा उपलब्ध नाही. इंग्रज वकील फॉस्टर १७८८ मध्ये नागपुरास आला होता. पंतांबाबत त्यांनी लिहून ठेवले की, ‘हल्लीचा बक्षी भवानी काळू ७० वर्षे वयाचा असून भोसले शाहीतील जुना नोकर आहे. भोसल्यांच्या चाकरीत त्याने मोठे नाव आणि पैसा कमाविला. मुधोजी त्यास फार मान देतो.’’ यावरून खडी धामणी येथील ऋग्वेदी ब्राम्हण पटवाऱ्याच्या(कुळकर्णी) घरी जन्मास आलेल्या भवानीपंतांचे थोरपण दिसून येते.

(संदर्भः यशोधन, संपादक-प्रा. राम शेवाळकर)

९६५७८६७७४७

loading image
go to top