
नागपूर : ॲट्रॉसिटी दाखल असताना कुकरेजा यांना अटक का नाही?
नागपूर : भाजप नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असताना त्यांना अद्याप अटक झाली नाही. ते शहरात खुलेआम फिरत आहेत. यावरून पोलिसांवर भाजपचा दबाव असल्याचे सिद्ध होते, असा आरोप कॉंग्रेसने केला आहे. कुकरेजा यांना तत्काळ अटक न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही कॉंग्रेसने दिला आहे.
काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे आणि अ.भा. काँग्रेस कमेटी अनुसूचित जाती सेलचे राष्ट्रीय समन्वयक अनिल नगराळे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. कॉंग्रेस कार्यकर्ते बाबा खान यांना कुकरेजा यांच्या कार्यालयात मारहाण झाली तेव्हा महिलाही त्यांच्यासोबत होत्या. हुडको कॉलनीतील समस्या घेऊन बाबा खान चार महिलांसह कुकरेजा यांच्या कार्यालयात गेले होते. कुकरेजा नेहमी खोटे आरोप करतात म्हणून आम्ही व्हिडीओ रेकॉर्डिंग करीत होतो. पण कुकरेजा यांनी कार्यालयात मोबाईल हिसकावून घेतले नंतर त्यांच्या २० ते २२ कार्यकर्त्यांनी मारहाण केली. कुकरेजा यांच्या कार्यालयात सीसीटीव्ही लावले होते. लगेच ते फुटेज काढून टाकले. आमच्या कार्यालयात सीसीटीव्हीच नसल्याची खोटी माहिती कुकरेजा देत असल्याचा आरोप नगराळे यांनी पत्रकार परिषदेत केला.
पोलिसांवर दबाव टाकण्यासाठी दटकेसह कार्यकर्त्यांना बोलावले
पोलिसांवर दबाव टाकण्यासाठी कुकरेजा यांनी प्रवीण दटके व इतर भाजपच्या कार्याकर्त्यांना बोलावून घेतले. मुंबईतही भाजपच्या एका बड्या नेत्याने फोन करून दबाव टाकला. या घटनेस हिंदू-मुस्लिम असा जातीय रंग देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सहा वाजेपर्यंत पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. सर्वांत शेवटी गुन्हा दाखल केला, असेही नगराळे यांनी सांगितले.
धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न -बाबा खान
आपण मुस्लिम असल्याने या वादाला कुकरेजा यांनी हिंदू-मुस्लिम असा रंग देण्याचा प्रयत्न केला. तोडफोड त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केली. नंतर सिंधी समाजातील नागरिकांना मेसेज करून एका मुस्लिमाने हिंदूवर हल्ला केला याचा विरोध दर्शवण्यासाठी समोर येण्याचे आवाहन केले. त्यांच्या सांगण्यावरून जरीपटक्यातील बाजारपेठा बंद केल्या. चौकामध्ये टायर जाळले. यापूर्वी कुकरेजा यांनी आपणास फोनवरून धमक्या दिल्या आणि सध्याच्या घटनेनंतर स्वतःच्या बचावासाठी पोलिस ठाणे गाठले. आमच्या विरोधात खोटी तक्रार नोंदवल्याचे बाबा खान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ही घटना घडली तेव्हा कुकरेजा यांच्या कार्यालयात एकही महिला उपस्थित नव्हती. तरीही भाजपच्या एक महिला कार्यकर्त्याचा विनयभंग केल्याचा आरोप ते आपणावर लावत असल्याचे बाबा खान यांनी सांगितले.
कुकरेजांची जामिनासाठी न्यायालयात धाव
नागपूरः अटकपूर्व जामिनासाठी कुकरेजा यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. कार्यालयात झालेल्या वादानंतर महिलेच्या तक्रारीवरून कुकरेजा व त्यांच्या समर्थकांविरुद्ध विनयभंग, शिवीगाळ व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. कुकरेजांनी त्यांचे वकील उदय डबले आणि ॲड. प्रफुल्ल मोहगावकर यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने कुकरेजांना अंतिम दिलासा देण्यास नकार दिला. या अर्जावर ३ मार्चला सुनावणी होणे अपेक्षित आहे.