नागपुरात अल्पवयीन मुलीवर गॅंगरेप; मात्र, पोलिसांची तक्रार घेण्यास टाळाटाळ

Atrocities on a minor girl in Nagpur
Atrocities on a minor girl in Nagpur
Updated on: 

नागपूर : एका १६ वर्षीय मुलीवर कुख्यात गुंड आणि तीन साथीदारांनी सामूहिक बलात्कार केला. ही खळबळजनक घटना न्यू कैलासनगरात घडली. अजनी पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशानंतर तक्रार दाखल करून घेत चारही आरोपींना रात्री उशिरा अटक केली. अटकेतील आरोपींमध्ये अमित लोखंडे (२२, रा. कैलासनगर), प्रशिक गोटे (२५), विशाल ऊर्फ दत्तू खाटक आणि बिट्टू वाघमारेचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामकुलर चौक परिसरात राहणारी १६ वर्षीय मुलगी स्विटी (बदललेले नाव) हिची मामेबहीण बाबुलखेडाच्या वसंतनगरात भाड्याने खोली करून एकटीच राहते. तिची एक मैत्रीण आहे. ती मैत्रीण आरोपी अमित लोखंडेची प्रेयसी आहे. स्विटी आपल्या मामेबहिणीला भेटण्यासाठी नेहमी खोलीवर यायची. यावेळी अमितने तिला पाहिले होते. बहिणीला भेटायला नेहमी खोलीवर येत असल्याने तिच्या मैत्रिणीसोबतही स्विटीची चांगलीच ओळख झाली. दोघींमध्ये मैत्री झाली.

सोमवारी स्विटी बहिणीच्या मैत्रिणीसोबत अमितला भेटायला गेली होती. यानंतर मंगळवारी दोघीही कैलासनगर येथील एका महाविद्यालयाजवळ पुन्हा अमित आणि त्याचा मित्र प्रशिकला भेटल्या. तेथून दोन्ही आरोपी त्यांना दत्तूच्या घराजवळ राहणाऱ्या एका नातेवाईकाच्या घरी घेऊन गेले. तेथे प्रशिकने चाकूच्या धाकावर पीडितेचे कपडे फाडून बलात्कार केला. यानंतर अमितनेही तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी त्यांचे मित्र दत्तू खाटक आणि विशाल यांनाही बोलावून घेतले. त्या दोघांनीही स्विटीवर सामूहिक बलात्कार केला.

मोबाईलने तिचे अश्लील व्हिडिओ आणि फोटोही काढले. तसेच याबाबत वाच्यता केल्यास ते फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. मात्र, स्विटीने घटनेची माहिती आपल्या मामेबहिणीला दिली. यानंतर सायंकाळी ६.३० वाजता स्विटीने बहिणीसोबत अजनी पोलिस स्टेशन गाठून पोलिसांसमोर घडलेला प्रकार सांगितला. सुरुवातीला नकारघंटा वाजविणाऱ्या अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. दत्तू हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. काही दिवसांपूर्वीच तो एका अत्याचाराच्या प्रकरणात शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आला आहे.

तक्रार घेण्यास टाळाटाळ

अजनी पोलिसांनी पीडितेची तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. ठाण्यातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने तक्रार न करण्यासाठी पीडितेवर दबाव टाकला. आरोपी सराईत गुन्हेगार असल्याने याचे परिणाम वाईट होतील असे पीडितेला सांगितल्याची चर्चा आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी आरोपींविरुद्ध कोणताही गुन्हा नोंदविलेला नव्हता. मात्र, नंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर अजनी पोलिसांना गुन्हा नोंदवून आरोपींना अटक करावी लागली.

पूजाच्या नावाची चर्चा

सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या पूजा नावाच्या महिलेने पोलिसांना ‘सेट’ करण्याचा प्रयत्न केला. एका पोलिस अधिकाऱ्यासोबत कारमध्ये बसून चर्चाही साधली. तिच्या सेटिंगमुळेच अजनी पोलिस बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत होते, अशी चर्चा होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com