बच्चू कडू-रवी राणांची ईडीमार्फत चौकशी करा; काँग्रेसची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Atul londhe ED inquiry demand

बच्चू कडू-रवी राणांची ईडीमार्फत चौकशी करा; काँग्रेसची मागणी

नागपूर : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी असलेले अमरावती जिल्ह्यातील खासदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात सध्या खोक्यांवरून वाद सुरू आहे. यामुळे या दोघांचीही ईडीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.

आमदार कडू यांनी खोके घेतल्याचे राणा यांनी पुरावे सादर करावे तसेच कोणी पैसे घेतले याचे उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करावा, अशी मागणी केली आहे.

अन्यथा एक नोव्हेंबरला आपण आंदोलन करून पुढील भूमिका ठरवू असाही इशारा दिला आहे. राणा दाम्पत्य राष्ट्रवादीच्या जवळ होते. मात्र अलीकडे ते भाजपचे समर्थक झाले आहेत. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांच्या विरोधात त्यांनी मुंबईत त्यांच्या बंगल्यासमोर हनुमान चालिसाचे पठण केले होते. बचू कडू आघाडी सरकारच्या काळात राज्यमंत्री होते.

शिवसेना आमदारांच्या बंडात ते सहभागी झाले होते. शिंदेसेना-भाजप सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून बढती मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र त्यांना मंत्रिमंडळातच स्थान देण्यात आले नाही. आता खोक्यांवरून भाजप समर्थक आमदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे.

या वादावर बोलताना अतुल लोंढे म्हणाले, जर परमबीर सिंग यांच्या एका वक्तव्याने राज्यात मोठा गदारोळ होऊ शकतो, सीबीआय आणि ईडी चौकशी करू शकतात त्याचप्रमाणे एका जबाबदार आमदाराने दुसऱ्या आमदारावर पैसे घेऊन सरकार पाडल्याचा आरोप केला असेल तर त्याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.

आयकर विभागानेही याची चौकशी करायला हवी. कुठून हवाला झाला? पैसे कुठून गेले? कुणी दिले? कुणी घेतले, कुणाच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत का, या सर्व प्रश्‍नांची उत्तरे ईडी आणि आयकर विभागाने चौकशी करून जनतेला द्यावी. एकमेकावर जी चिखलफेक सुरू आहे, त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे, असेही अतुल लोंढे म्हणाले.