
बाबरी प्रकरण : "बाळासाहेब ठाकरेंसह तिघांचा भारतरत्न देऊन सन्मान करावा"
नागपूर : अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेला आज २९ वर्षे पूर्ण झाली. यासाठी उभारलेल्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या आणि जबाबदारी घेणाऱ्या चार प्रमुख नेत्यांचा मोदी सरकारनं भारतरत्न देऊन गौरव करावा अशी मागणी, विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केली आहे. या चार नेत्यांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, विश्व हिंदू परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत अशोक सिंघल, महंत रामचंद्र परमहंस आणि महंत अवैद्यनाथ यांचा समावेश असल्याचंही तोगडिया यांनी म्हटलं आहे. नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
अगदी सुरूवातीच्या काळात राम मंदिरासाठी कोणीही पुढे येऊन जबाबदारी घेण्यास तयार नव्हते. अशा काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, विहिंपचे दिवंगत अध्यक्ष अशोक सिंघल, महंत रामचंद्र परमहंस तसेच महंत अवैद्यनाथ या चौघांनी जनजागृतीद्वारे अयोध्येत राम मंदिर व्हावे यासाठी वातावरण निर्मिती केली. त्यामुळे त्यांचा भारतरत्न देऊन सन्मान करण्यात यावा, अशी मागणी तोगडीया यांनी केली.
अयोध्येत राम मंदिर होत आहे ही स्वागतार्ह बाब आहे. पण, आज रामाच्या नावावर सत्तेत आलेले रामराज्य विसरले आहेत, अशा शब्दांत तोगडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, "केंद्रातील सत्ताधारी रामामुळेच सत्तेत आले आहेत. मात्र, आता ते रामराज्य विसरले आहे. भारताला अमेरिका करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आम्हाला भारतात रामराज्य हवे आहे. आर्थिक विकासाच्या नावाखाली हिंदुंचा बळी दिला जात आहे. मुठभर भांडवलशहांच्या हातात संपत्ती एकवटली जात आहे तर गरीब आणखी गरीब हात आहे. बेरोजगारी वाढत आहे. शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे. केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी चुकीचा मार्ग निवडला आहे. रामराज्यात हे अपेक्षित नव्हतं"
भारतीय लोकसंख्येमध्ये असंतुलन निर्माण होत असून विशेषत: हिंदुंच्या लोकसंख्येत ते प्रकर्षानं जाणवतंय. विविध धर्मांतील लोकांचा जन्मदर वेगवेगळा आहे. हे लक्षात घेता केंद्र सरकारने दोनपेक्षा अधिक मुले जन्माला घालण्यावर बंदी आणणारा कायदा आणवा, अशी मागणीही यावेळी प्रवीण तोगडीया यांनी केली. केंद्रानं प्रकाशित केलेल्या जन्मदर वृद्धी अहवालाचा उल्लेख करताना यामध्ये हिंदूंचा जन्मदर २ टक्क्यांवर स्थिरावल्याचं तोगडिया म्हणाले. ही बाब अशीच सुरु राहिली तर १४० कोटींवरून हिंदुंची लोकसंख्या १०० कोटींवर यायला वेळ लागणार नाही, असा दावाही तोगडिया यांनी केला. मुस्लिमांचा जन्मदर २.५० टक्के असून याच वेगाने त्यांची लोकसंख्या वाढत राहिली तर भारत इस्लामिक स्टेट व्हायला वेळ लागणार नाही, असा इशाराही यावेळी तोगडीया यांनी दिला.
Web Title: Babri Case Balasaheb Thackeray Should Be Honored Bharat Ratna Praveen Togadia
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..